मराठी साहित्य संमेलन दिल्लीत Marathi माणसाचे महत्त्व वाढवणारे ठरेल; परिसंवादातील आशावाद

40
मराठी साहित्य संमेलन दिल्लीत Marathi माणसाचे महत्त्व वाढवणारे ठरेल; परिसंवादातील आशावाद
  • प्रतिनिधी 

‘दिल्लीत होणारे मराठी साहित्य संमेलन दिल्लीतील मराठी माणसाचे महत्त्व वाढवणारे ठरेल’, अशा भावना ‘मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली’ या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केल्या. दिल्ली हे शहर महाराष्ट्रापासून काहीसे दूर असले तरी दिल्लीचे तख्त मजबूत राखण्यासाठी कायम मराठी माणूस मजबुतीने उभा राहिला आणि यामध्ये मराठी भाषा, मराठी (Marathi) संस्कृती आणि एकूण मराठीपणाचे मोठे योगदान होते, अशाही भावना मान्यवरांनी बोलून दाखवल्या. सरहद, पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या परिसंवादाचे दिल्लीत आयोजन करण्यात आले होते.

मराठी (Marathi) साहित्य संमेलनानिमित्त महाराष्ट्रासह दिल्ली आणि देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. याचाच एक भाग म्हणून दिल्लीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, खासदार अरविंद सावंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आनंद पाटील, भारतीय डाक विभागातील संचालक सौरभ देशमुख, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, दिल्लीस्थित जेष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी सहभाग घेत आपले विचार व्यक्त केले. दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत वाघाये आणि नुपूर साळुंखे यांनी हा संवाद घडवून आणला. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जात आहेत. दिल्लीत होत असेलेले ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक होईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – ST Corporation President : आता प्रताप सरनाईक नाही तर ‘हे’ असतील एसटी महामंडळाचे अध्यक्ष)

या परिसंवादादरम्यान, बोलताना आनंद पाटील म्हणाले की, तमिळनाडूपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहून महाराष्ट्र अनेक वर्षांपासून बघितला. महाराष्ट्राबाहेर विविध राज्यांमध्ये नोकरी, व्यवसाय या निमित्ताने इतर राज्यांमध्येही मराठी माणसं काम करत आहेत. त्यांना एक संघटित स्वरूप प्राप्त व्हावं, या माध्यमातून आपला दैदीप्यमान इतिहास आपल्या नव्या पिढ्यांनाही माहिती व्हावा आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी (Marathi) बांधवांकडूनही महाराष्ट्राची सेवा घडावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर अनेक लोकांना नोकरी, व्यवसायासाठी जेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त बाहेर पडावे लागते तेव्हा त्यांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी दिल्ली किंवा ठिकठिकाणी काम करणारे मराठी भाषिक ज्येष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक अधिकाऱ्यांना, लोकांना महाराष्ट्राबाहेर स्थिरस्थावर होताना नोकरीच्या निमित्ताने ज्येष्ठ अधिकाऱ्यांची मदत झाली. त्यांनी स्थापन केलेले मराठी माणसाचे समूह, संस्थांची मदत झाली. त्यामुळे मराठीजणांचं हे जाळं खूप महत्त्वाचं असतं, अशा भावना सौरभ देशमुख यांनी व्यक्त केल्या.

तर डॉ. मेधा कुलकर्णी आणि अमोल कोल्हे यांनी खासदार होण्यापूर्वी महाराष्ट्रातून दिल्लीला राजधानी म्हणून ते कसे बघत होते, त्यावेळी त्यांच्या काय भावना होत्या. पुढे संसदेत खासदार म्हणून आल्यानंतर दिल्लीतून महाराष्ट्र आणि देशाकडे कसे बघतात यावर भाष्य केले. महाराष्ट्रात जन्माला आलेले महापुरुष, इतिहासात त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व हे कायम प्रेरणादायी असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य, पानिपतची लढाई अशा ऐतिहासिक घडामोडींचे संदर्भ दिले. राजधानी दिल्लीत अनेक लोक नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने येतात. पुढे येथे स्थिरस्थावर होतात. मध्येच पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ लागते. या परिस्थितीमध्ये आपले मराठी (Marathi) सण, उत्सव, आपल्या लोकांना साजरे करता आले पाहिजेत. आपण जिथे राहतो तिथे मराठी वातावरण नाही, अशा भावना दिल्लीत आलेल्या मराठी जणांच्या मनात येऊ नयेत, यासाठी दिल्लीत राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आणि त्याचे महत्त्व वैभव डांगे यांनी सांगितले.

(हेही वाचा – सरकारी संगणकावर AI नको; केंद्र सरकारने जारी केले परिपत्रक)

सुनील चावके यांनी अनेक वर्षांपासून राजधानी दिल्लीत येत असलेली नेतेमंडळी, त्यांचं दिल्लीतील राजकीय जीवन यावर भाष्य केले. तसेच नोकरीचा भाग म्हणून अनेक माध्यमकर्मी, व्यावसायिक देखील दिल्लीत आहेत, त्यांचा प्रवास त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यातून मार्ग कसा काढावा, यावरही त्यांनी भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल यांनी तर आभार प्रदर्शन लेशपाल जवळगे यांनी केले. एकेकाळी यशवंतराव चव्हाण, मधू लिमये, वसंत साठे, प्रमोद महाजन अशी दिग्गज नेते मंडळी दिल्लीत होती. या सर्वांची आठवण परिसंवादात सहभागी सर्व मान्यवरांनी काढली. आज केवळ नितीन गडकरी हे नेते मराठी (Marathi) वजनदार नेते म्हणून दिसतात, इतर लोकं मात्र इथे रमताना दिसत नाही, असाही सूर या परिसंवादात उमटला. महाराष्ट्रातील मराठी माणूस दिल्लीत राहतो, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना आपली भाषा नीट बोलता आली पाहिजे, ती शिकवली गेली पाहिजे. मराठी भाषिक लोकांचं सण-उत्सवानिमित्त एकत्रीकरण झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. मराठी माणसासाठी हक्काचं व्यासपीठ उभारलं पाहिजे आणि राजधानी दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदन’ हे दिल्लीत राहणाऱ्या मराठी लोकांना आपलं माहेरघर वाटलं पाहिजे, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने प्राधान्याने काही गोष्टी कराव्यात, अशा अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.