संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (Sanjay Gandhi National Park, SGNP) इको-सेंसिटिव्ह झोन (ESZ) आणि तटीय नियमन क्षेत्रात (CRZ) मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कचरा टाकल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal, NGT) ठाणे महापालिकेला नोटीस बजावली आहे. हा मुद्दा अॅड. वैभव साटम यांनी उपस्थित केला असून ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई का केली नाही, याचे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
ठाण्यातील गायमुख जकात नाका, घोडबंदर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून हे संपूर्णतः पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तटीय नियमन क्षेत्र अधिसूचना २०११ तसेच इको-सेंसिटिव्ह झोन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. या बेकायदेशीर कचरा टाकण्यामुळे नैसर्गिक परिसंस्थेचे मोठे नुकसान होत असून, येथील जैवविविधता, जलस्रोत आणि वन्यजीव धोक्यात आले असल्याची बाब अॅड. वैभव साटम यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिली.
ठाणे महानगरपालिका (TMC), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), महाराष्ट्र तटीय झोन व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA) आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC) यांना यापूर्वीच कायदेशीर नोटीस, छायाचित्रे आणि तक्रारी सादर करण्यात आल्या होत्या. तथापि, कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर अॅड. वैभव साटम यांनी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
बेकायदेशीर कचरा टाकण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी, जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी व दंडात्मक उपाययोजना कराव्यात, पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, महापालिकेने या संदर्भात झालेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करावा अशा सूचना अॅड. वैभव साटम यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या नोटीसनंतर केल्या आहेत.
महापालिका व पर्यावरण विभाग यांचे वारंवार दुर्लक्ष आणि निष्क्रियता गंभीर प्रश्न निर्माण करीत आहे. जर तातडीने योग्य कारवाई झाली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल. NGT च्या हस्तक्षेपामुळे महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवली जाईल आणि ठाणे शहरातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील,असे अॅड. वैभव साटम यांनी स्पष्ट केले आहे. (Thane Municipal Corporation)
Join Our WhatsApp Community