-
खास प्रतिनिधी
काही स्वच्छ मनाचे लोक दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधतात, तर काही संधीसाधू दुसऱ्याच्या अडचणीत आपल्याला संधी कशी मिळेल, यांचा विचार करतात आणि हा मानवी स्वभाव आहे.
भुजबळ ‘अॅक्टिव’
गेली अनेक दिवस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यात भर पडली ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणाने. म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. तर दुसरीकडे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे गेल्या चार दिवसांत फारच ‘ऍक्टिव्ह’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क वाढवला असून काही ‘अ-राजकीय’ विषयांवर पाठपुरावा सुरू केला आहे. येवला मतदारसंघातीलच विकास कामेच नव्हे तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या खात्यातील योजनांबाबत भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे.
(हेही वाचा – BMC School : महापालिका शाळांत एमडीएफ डेस्क-चेयर वादात; विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका?)
नागरी समस्या
येवला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना, येवला शिवसृष्टीच्या उर्वरित कामासाठी वाढीव ५ कोटी वाढीव निधी, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार समिती आवारासाठी जागा मंजूरी, येवला शहर पोलीस स्टेशन, लासलगाव पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी इमारती, येवला तालुका पोलीस स्टेशन इमारत विस्तारीकरण, पोलीस कवायत मैदान येवला संरक्षण भिंत यासह विविध विकास कामाबाबत भुजबळ यांनी फडणवीस यांना पत्र दिले आहे.
ओबीसी विषय
याशिवाय ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नेमलेल्या समर्पित आयोगाच्या अहवालातील त्रुटींवर उपाययोजना करून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयाच्या प्रतींची छपाई करून वितरणासाठी उपलब्ध करून द्या, अशा काही सामाजिक विषयांवरील प्रश्न फडणवीस यांच्याकडे मांडले.
खात्याची योजना
राज्यातील गोर-गरीब गरजू नागरिकांसाठी राज्यात सुरु करण्यात आलेली ‘शिवभोजन थाळी’ योजना पुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
(हेही वाचा – दिल्लीतील संभाव्य पराभवामुळे राहुल गांधींची रडारड; Chandrashekhar Bawankule यांचे प्रत्युत्तर)
पवार-भुजबळ फोन
गुरुवारी ६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केल्याचे सांगितले. ते म्हणाले की, तीन-चार दिवसांपूर्वी अजित पवार यांचा फोन आला होता आणि त्यांनी विलंबाने फोन केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच लवकरच भेटून बोलू, असे पवार म्हणल्याचे भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.
भाजपा प्रवेशाची चर्चा
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना डावलल्यानंतर भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त करत नागपूर हिवाळी अधिवेशना अर्धवट सोडून थेट नाशिक गाठले. अधिवेशन संपताच भुजबळ यांनी आपली खदखद अजित पवार यांच्याकडे नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन यांच्याकडे व्यक्त केली. त्यानंतर भुजबळ भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा न्यूज चॅनलवर सुरू झाल्या. नागपूर अधिवेशनानंतर भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि अजित पवार यांच्यात संपर्क नव्हता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अजित पवार यांच्या फोनमुळे पक्षातील नेत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
(हेही वाचा – मंत्रालय प्रवेशासाठी Facial Recognition प्रणाली अनिवार्य; आमदारांचे स्वीय सहाय्यक अडचणीत)
आशा पल्लवित
एकीकडे राष्ट्रवादीचे नेते, ओबीसी चेहेरा आणि अन्न-नागरी पुरवठा मंत्री मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार असताना माजी अन्न-नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी वाढलेला पत्र’व्यवहार’ आणि अजित पवार यांचा फोन; यामुळे भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या असाव्यात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community