राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा शुक्रवारी येथील पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यावेळी हे दोन्ही नेते शाहुपुरी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना, एकमेकांसमोर आले. त्यावेळी त्यांच्यात काही चर्चाही झाली. ही चर्चा नेमकी काय होती, याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. पण या भेटीमागचे खरे कारण काय आहे, त्याबाबतची माहिती काही सूत्रांकडून मिळत आहे.
अशी झाली भेट
शाहुपुरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा पोहोचले, तेव्हा देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथे असल्याचे त्यांना समजले. त्यावेळी त्यांनी फडणवीसांना तिथेच थांबण्याचा निरोप दिला. तसेच वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करू, असा आग्रह सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धरला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांचा मान राखत त्यांची भेट घेतली, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
(हेही वाचाः ‘ते’ फडणवीस नव्हे, तर ‘फर्द नलीस’! राज ठाकरेंनी सांगितला आडनावांचा इतिहास)
फडणवीसांनी काय सांगितले मुख्यमंत्र्यांना?
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची ज्यावेळी भेट झाली, तेव्हा त्यांच्यात काही चर्चा होत असल्याचे माध्यमांमध्ये पहायला मिळाले. यावेळी त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगत असल्याचे त्यावेळी पहायला मिळाले. त्यानंतर माध्यमांशी चर्चा करताना फडणवीसांनी या चर्चेमागचा खुलासा केला. या पूरपरिस्थितीसाठी काहीतरी कायमस्वरुपी उपाय करणं गरजेचे असून, यावर बैठक घेऊन निर्णय घ्यायला हवा, असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दिला आधार
मुख्यमंत्र्यांनी शाहुपुरीतील पूरग्रस्तांची चौकशी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना धीर देण्यासाठी घाबरू नका, काळजी करू नका असे सांगून त्यांचे सांत्वन केले. लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन या परिसरातील पूरपरिस्थितीवर मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी पूरग्रस्तांना दिले.
(हेही वाचाः सत्ताधाऱ्यांना खुर्ची बोचायला लागली! फडणवीसांनी सांगितले सरकारचे भवितव्य )
Join Our WhatsApp Community