![HSC Exam 2025: ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार; कॉपीमुक्तीसाठी २७१ भरारी पथकांची नियुक्ती HSC Exam 2025: ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार; कॉपीमुक्तीसाठी २७१ भरारी पथकांची नियुक्ती](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-10T184303.076-696x377.webp)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) नऊ विभागीय मंडळांमार्फत बोर्डाची परीक्षा (12th Board Exam) घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. (HSC Exam 2025)
दरम्यान या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली आणि ३७ तृतीयपंथी असणार आहेत. तर १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
(हेही वाचा –Murder : प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; मिसिंग तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी केला गुन्ह्याचा उलगडा)
हे वेळापत्रक ग्राह्य धरावे
विद्यार्थ्यांच्या (Student) मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीनं इ. १२ वी परीक्षेचं वेळापत्रक तयार करण्यात आलं. परीक्षेदरम्यान बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द आणि छपाई केलेलं वेळापत्रकच ग्राह्य धरावं. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक
शरद गोसावी म्हणाले की, परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली. तर मागील पाच वर्षाच्या काळात 818 केंद्रावर सातत्याने गैरप्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे ती सर्व केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्याबाबत सांगायचे झाल्यास, पुणे 125, नागपूर 104, छत्रपती संभाजीनगर 205, मुंबई 57, कोल्हापूर 39, अमरावती 124, नाशिक 88, लातूर 73, कोकण 3 ही एकूण 818 केंद्र आहेत. या सर्वांवर विशेष लक्ष मंडळाचे असणार असल्याचे शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – Tirupati लाडू घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; SIT कडून चौघांना अटक )
ड्रोन कैमेराव्दारे चित्रीकरण करणार
कॉपीमुक्त अभियनासाठी (Copy free campaign) राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कैमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. तसंच परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर (Examination Centre) आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. तसेच परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची एफसीआरव्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community