कोरोना संकट असले तरी सध्या सर्व पक्षांना वेध लागले आहेत ते होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांकडे…त्यातच शिवसेनेचा जीव ज्या मुंबई महापालिकेमध्ये अडकला आहे त्या मुंबई महानगर पालिका निवडणुका देखील फेब्रवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. याचमुळे आता सर्व पक्ष कामाला लागले असून, शिवसेनेने देखील मराठी मुद्द्याला हात घालायला सुरुवात केली आहे.
गेली अनेक वर्षे मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत असून, मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेने गेली अनेक वर्ष राज्यात आणि विशेषत: मुंबईत राजकारण केले. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा घेतल्याने शिवसेनेच्या मराठीच्या मुद्द्याची धार कमी झाली आणि त्यांनी जोडीला हिंदुत्वाचा मुद्दा देखील रेटून नेला. मात्र आता याच राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्याला हात घातल्याने शिवसेना कुठे तरी पुन्हा मराठीच्या मुद्याला हात घालण्याचा प्रयत्न करताना पहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय सध्या पहायला मिळत आहे. वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या भूमिपूजनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिवसेनेने मराठी माणसाला साद घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. युवासेनेचे सरचिटणीस यांनी ट्वीट करत तसे संकेतच दिले. त्यामुळे आता ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची मराठी अस्मिता जागी झाली की काय, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
(हेही वाचा : दंतेवाडातील १५ गावे होणार नक्षलमुक्त! महाराष्ट्रातही चालवले जाते ‘ते’ अभियान!)
नेमके काय म्हणाले वरूण सरदेसाई?
युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी ट्वीट करत शिवसेनेचे मराठी माणसाच्या घराघरात आणि मनामनात स्थान असल्याचे म्हणत काही फोटो ट्विटरवर टाकले आहेत. ‘हे स्थान आहे शिवसेनेचं मराठी माणसाच्या घराघरात आणि मनामनात! शिवसेनेच्या प्रयत्नामुळेच हजारो मराठी कुटुंबांना आपल्या हक्काचे घर वरळीत मिळणार! शिवसेना – मुंबई आणि शिवसेना भवन – मराठी माणूस हे समीकरण कोणीही कितीही प्रयत्न केले तरी बदलू शकत नाही, असे ट्वीट वरूण सरदेसाई यांनी केले.
हे स्थान आहे शिवसेनेचं मराठी माणसाच्या घराघरात आणि मनामनात !
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 1, 2021
शिवसेनेच्या प्रयत्यांमुळेच हजारो मराठी कुटुंबांना आपल्या हक्काचे घर वरळीत मिळणार !
शिवसेना – मुंबई आणि शिवसेना भवन – मराठी माणूस हे समीकरण कोणीही कितीही प्रयत्न केले तरी बदलू शकत नाही pic.twitter.com/kfQHgTAysb
मराठी माणूस हद्दपार
मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्याची सुपारी शिवसेनेने घेतल्याची टीका काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. आमचे नेते अतुल भातखळकर यांची लढाई आणि संघर्ष मराठी माणसासाठीच सुरू आहे. महापालिका निवडणूक जवळ येईल, तेव्हा यांची मराठी अस्मिता जागी होईल. त्यावेळी समस्त मराठी माणसांनी आजचा दिवस लक्षात ठेवावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले होते.
मुंबईतील मराठी टक्का घसरला त्याचे काय?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या मराठी मुद्यावर शिवसेना वारंवार बोलत आहे त्याच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबईत मराठीचा टत्ता हळूहळू घसरू लागला आहे. मराठी मुंबईचा हळूहळू हिंदी भाषिकांचे शहर बनण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाली आहे. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार हिंदी भाषिकांचा आकडा हा 40 टक्क्यांनी वाढलाय. 2001 मध्ये ही संख्या 25.88 लाख होती, तीच दहा वर्षांत 35.98 लाख झाली आहे. म्हणजे 10 वर्षांत तब्बल 10 लाख हिंदी भाषिकांची संख्या वाढली. तर मराठी भाषिकांमध्ये 2.64 टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे. 2001 मध्ये 45.23 लाख मराठी मातृभाषिक होते, तेच 2011 मध्ये 44.04 लाख झाले आहेत. ही लोकसंख्या 2011 मधील असली तरीही गेल्या १० वर्षांमध्ये मराठी भाषिकांचा उपनगरांकडचा प्रवास मोठ्या प्रमाणावर वाढलाय.
Join Our WhatsApp Community