‘कम्बोडिया’ हा देश सायबर गुन्हेगारीमुळे कुप्रसिद्धीच्या झोतात येत आहे, कारण सायबर माफियांनी या देशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.भारतीय नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या चिनी सायबर गुन्हेगारांनी कम्बोडियाला ऑनलाईन फसवणुकीचे केंद्रबिंदू बनवले आहे मुंबई पोलिसांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणात कम्बोडियात बसलेल्या सायबर गुन्हेगाराना मदत करणाऱ्या जवळपास २४ भारतीयांना अटक केली आहे.कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीत अटक करण्यात आलेल्या या टोळ्या कम्बोडियात बसलेल्या सायबर गुन्हेगाराना भारतीय नागरिकांचे बँकखाती पुरवून मोबदल्यात मोठे कमिशन मिळवत होते अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.अटक करण्यात आलेल्या या टोळीतील अनेक तरुणांनी अनेक वेळा ‘कम्बोडिया’ या देशाला भेट देऊन सायबर गुन्हेगारांशी हातमिळवणी केल्याचे तपासात समोर आलेले आहे. (Cyber Crime)
मुंबईतील डोंगरी पोलिस ठाण्यात मागील वर्षी दाखल असलेल्या एका सायबर फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना डोंगरी पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी यांनी डिसेंबर २०२४ मध्ये गौतम गोपाल दास आणि श्रीनिवास राजू राव या दोघांना अटक केली होती, त्यांच्या चौकशीत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात राहणारा ओंकार थोरात याचे नाव समोर आले, तपास पथकाने ओंकारला अटक केल्यानंतर आम्ही आमची बँक खाती हिंजवडी पुणे येथे राहणारा मित्र श्रीकांत बाळासाहेब साळुंखे याला विकल्याची माहिती दिली. साळुंखे याच्या चौकशीत जळगाव जिल्हयातील भुसावळ येथे राहणारा ओजस चौधरी याचे नाव समोर आले. पोलिसांनी चौधरी याला मुंबई सेंटर येथे सापळा रचून अटक केली, त्याच्या चौकशीत या गुन्ह्यात गुंतलेल्या अनेकांची नावे समोर आली. (Cyber Crime)
(हेही वाचा- Prayagraj Kumbh Mela 2025 : वाहतूक कोंडीनंतर प्रशासनाने उचलली गंभीर पावले; ५२ वरिष्ठ अधिकार्यांची नियुक्ती)
डोंगरी पोलिसांनी या प्रकरणात आकाश दुसाने उर्फ आकाश सोनार राहणार -नाशिक जिल्ह्यातील पार्थडी फाटा, दिनेश तायडे रा.ठी पाथर्डी फाटा नाशिक, मोहम्मद राजीक सादिक पटेल यांच्यासह ११ जणांना अटक केली. त्यातील पाच जणांना गोवा येथुन अटक करण्यात आली, आणि अशोक तायडे यांच्याकडून पोलिसांनी जग्वार ही महागडी मोटार तर दुसाने कडून दुसरी महागडी मोटार जप्त करण्यात आली. या टोळीतील मुख्य आरोपी तायडे,दुसाने आणि मोहम्मद पटेल हे तिघे असून त्यांनी अनेक वेळा कम्बोडिया देशात जावून तेथील सायबर माफियांना भारतीय नागरिकांचे बँक खात्याची माहिती आणि कागदपत्रे पुरवली आहे, हे खाते सायबर गुन्हेगारीसाठी वापरले गेले आहे. (Cyber Crime)
गांवदेवी पोलिसकडून १२ जणांना अटक ……
दरम्यान गांवदेवी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी १२ जणांना अटक केली आहे, कम्बोडियाचे हे दुसरे मॉड्युल आहे, या जणांपैकी अनेकांनी कम्बोडियाला अनेक वेळा भेटी देऊन सायबर माफियांना शेकडो भारतीय बँक खाती पुरवली आहेत.अटक केलेल्या आरोपींपैकी तीन जण कंबोडियाला गेले होते, तेथून ते त्या देशात असलेल्या चिनी नागरिकांसह रॅकेट चालवत होते. आरोपींनी घोटाळ्यातील पैसे क्रिप्टो चलनात रूपांतरित केले आणि ते कंबोडियाला हस्तांतरित केले.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजेंद्र सिंग हा या घोटाळ्याचा सूत्रधार होता. “तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे पण त्याने स्वतःला कंबोडियन नागरिक म्हणून ओळखले आणि त्याचे बनावट नाव कुन हाश ठेवले,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “सिंग, कुलकर्णी आणि काळे यांनी यापूर्वी कंबोडियाला भेट दिली होती आणि सायबर फसवणुकीत सहभागी असलेल्या एका फर्ममध्ये काम केले होते. (Cyber Crime)
कम्बोडिया देशात चिनी नागरिकांकडून सायबर फसवणुकीसाठी कॉल सेंटर चालविण्यात येत आहे, या कॉल सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय तरुण तरुणींना नोकरीला ठेवले जाते, आणि त्यांच्याकडून संपूर्ण देशभरात फसवणुकीचे गुन्हे करून घेतले जाते, अशी माहिती समोर आली आहे. भारतीय तरुण तरुणींना परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे अमिष दाखवून कम्बोडिया येथे आणले जाते, त्यानंतर त्यांचे पासपोर्ट चिनी टोळीचे गुंड जमा करून घेतात आणि त्यांना बळजबरीने चुकीचे काम करण्यास भाग पाडतात अशीही माहिती समोर आली आहे. (Cyber Crime)
गुन्ह्याची पद्धत….
सिंग, कुलकर्णी आणि काळे यांनी सोलापूर, राजस्थान आणि पंजाबमधील तरुणांना त्यांच्या नावाने बँक खाती उघडण्यास राजी केले आणि त्यांना २% ते ५% कमिशन देण्याचे आश्वासन दिले. “खातेदार पैसे घेऊन पळून जाऊ नये म्हणून त्यांनी खातेधारकांना दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर होईपर्यंत किंवा रोख रक्कम काढेपर्यंत राहण्याची सोयही केली,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (Cyber Crime)
(हेही वाचा- Pune News : विद्यार्थ्याने पेपरला बारकोड लावला अन् मारली दुसऱ्या मजल्यावरुन उडी ; पुण्यातील धक्कादायक प्रकार)
कुलकर्णी आणि सिंग यांनी सर्व बँक खात्यांचे तपशील कंबोडियाला नेले आणि तेथे काम करणाऱ्या चिनी वंशाच्या लोकांना दिले. नंतर त्यांनी बँक खाते किट मिळवला आणि खात्यांशी जोडलेले मोबाइल सिम मिळवले. भारतातील आरोपींनी परदेशी आरोपींना ओटीपी शेअर केला. आरोपींच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर, त्यांनी ती विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केली, रोख रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केली आणि परदेशात पाठवली.केशव कुलकर्णी, राजेंद्र सिंह आणि नामदेव काळे हे सायबर गुन्हेगारी टोळीसोबत काम करण्यासाठी कंबोडियाला गेले होते आणि त्यांनी भारतातील इतर सहकाऱ्यांच्या मदतीने विविध भारतीय राज्यांमधील नागरिकांची फसवणूक केली. पोलिसांना अटक केलेल्या आरोपींशी जोडलेली एकूण ११० बँक खाती आणि त्यांच्या खात्यांमध्ये अंदाजे ३० कोटी रुपये जमा झाल्याचे आढळले आहे. आरोपींविरुद्ध दिल्ली, कोलकाता, नाशिक, कोल्हापूर, मुंबई, गुजरात आणि देशातील इतर ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Cyber Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community