Rock Climbing : ‘सॅक’ ची पंचविशी आणि २५ सुळक्यांची चढाई

115
Rock Climbing : ‘सॅक’ ची पंचविशी आणि २५ सुळक्यांची चढाई
Rock Climbing : ‘सॅक’ ची पंचविशी आणि २५ सुळक्यांची चढाई
शेखर राजेशिर्के

आपल्या देशात, सर्वात जास्त गडकोटांचा व लेण्यांचा गोतावळा महाराष्ट्रात, खरे तर सह्याद्री पर्वतराजीच्या परिसरात आहे. गडकोटांव्यतिरीक्त सह्याद्री पर्वतराजीतील कडेसुळक्यांचे विश्वही विलक्षण! कडेसुळक्यांच्या विशेष रचनांनी आलंकृत असलेल्या या पर्वतराजीमुळे साहसाची उर्मी बळावते. त्यामुळे गिरीभ्रमण वा गिर्यारोहण करणाऱ्या सर्वात जास्त संस्थाही महाराष्ट्रातच आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत, महाराष्ट्रातील गिर्यारोहणाची स्वत:ची अशी एक वेगळीच संस्कृती आहे. या संस्कृतीला १९४५ साला पासूनचा साहसांनी भरलेला इतिहासही आहे. अशा अनेक संस्थांत एक विशेष नाव गिर्यारोहण विश्वात गेली २५ वर्षे गाजतय, ती संस्था म्हणजे ‘दी सह्याद्री अॅडव्हेंचर क्लब, मुंबई’  (The Sahyadri Adventure Club) उर्फ ‘SAK किंवा सॅक’. या वर्षी या संस्थेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. (Rock Climbing)

(हेही वाचा – Ranji Trophy 2025 : मुंबईचा रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश, हरयाणाचा केला १५२ धावांनी पराभव)

“साहस हे ध्येय, निसर्ग हाच ध्यास। गिरीदुर्ग हे सगेसोयरे, सह्याद्री हाच श्वास ।।”
हे ध्येयवाक्य असलेल्या दी सह्याद्री अॅडव्हेंचर क्लबचे प्रस्तरारोहण करून सुळके चढाई व हिमालयन मोहीमा करून साहसी वृत्तीची जोपासना करणे हे उद्दीष्ट आहे. २६ जानेवारी २००० रोजी कसारा येथील भवानी सुळक्यावरील यशस्वी चढाई करून सॅक या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. यानंतर संस्थेने मागे वळून पहिलेच नाही. गेल्या २५ वर्षांत सह्याद्रीतील १६० सुळक्यांची यशस्वी चढाई केली आहे. त्यात सुद्धा तीसएक अजिंक्य कडेसुळक्यांवर यशस्वी चढाई झालेली आहे. तसेच ‘सॅक’ ने हिमालयात देखील, युनम, देवतिबा, हनुमान तिंबा, फ्रेंडशिप, क्षितिधर, चामशेर कांग्री आणि मेंथोसा आदी १५ शिखरावर यशस्वी मोहिमा केल्या आहेत.

२६ जानेवारी २००३ रोजी शहापूर-देहणे गावाजवळील ८०० फुट उंची असलेल्या व अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या बाण सुळक्यावर अंजिक्य मार्गाने यशस्वी चढाई करुन, ‘बाण चढाई’ करणाऱ्या मोजक्याच संस्थांमध्ये सॅक संस्थेचा समावेश झाला. डिसेंबर २००८ साली, अदमसे अडीच हजार फुटांच्या कोकणकड्याच्या मधल्या मार्गाने यशस्वी मोहीम पुर्ण झाली. त्याआधी फक्त दोन संस्थांनी ही मोहीम यशस्वी केली होती. कोकणकडा हे नाव घेणे व तो नुसता हरिश्चंद्रगडावरून पहाणे हेच मोठे साहस आहे. अशा ठिकाणी गिर्यारोहण मोहिमेचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष अशी सांघिक व तांत्रिक गुणवत्ता लागते. तीच गोष्ट आसनगाव जवळील माहुलीगडाची. हा गड तसा चाळीसएक अत्यंत कठीण अशा सुळक्यांनी वेढलाय. एकाच ठिकाणी इतके सुळके असणे हे जरी गिर्यारोहकांच्या पथ्यावर पडले असले तरी त्यांची चढाई सोडा, त्यांच्या पायापर्यंत जाण्यातही कसलेल्या गिर्यारोहकांचा कस लागतो. गच्च रान, अती निसरड्या वाटा, सतत अंगावर येणाऱ्या कातळाच्या अक्षता, पाण्याचे दुर्भिक्ष त्यामुळे इथे पोहचणे हेच दिव्य! पुढे सुळके चढाईची गोष्ट, तर त्याहून वेगळी. तर माहुलीतले हे सर्व सुळके सॅकच्या शिलेदारांनी आरोहण केले आहेत. एकदाच नाही तर बऱ्याच वेळा! त्यात सुद्धा १० सुळके अजिंक्य असे.

प्रस्तरारोहण करून सुळके चढाईचे साहस करणे, हे विशेष साहस आहे. गेली पंचवीस वर्षे, एक ही अपघात न होता सतत मोहीमा सुरू आहेत. साहसी मोहिमा म्हणजे जीविताला थोडाफार धोका असतोच, आणिबाणीच्या वेळा येतातच. त्या ‘वेळा’ सुध्दा योग्य प्रकारे सांभाळल्या जाऊ शकतात व सुरक्षित गिर्यारोहण करता येते हे ‘सॅक’ने इतक्या वर्षात पटवून दिलेले आहे. उच्चप्रतिचे सांघिक कार्य, सततचा सराव व उत्तम मानसिक व शारिरीक क्षमता. मग अपघात होईलच कसा? तशा वेळा कधी कधी येतात. परंतु त्या यशस्वीपणे हाताळल्या गेल्यात. कारण साहसाच्या व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षित व अनुभवी गिर्यारोहकांची दुसरी फळी ‘रेस्क्यु’ साठी नेहमी सज्ज असते. बाहेरून मदतीची गरज ही संस्था कधी येऊ देत नाही. कारण अपघाती आणिबाणीत ‘वेळ’ अत्यंत महत्वाची असते.

साहसी पण सुरक्षित गिर्यारोहण करणे जेवढे महत्वाचे तेव्हढेच महत्त्वाचे आहे ते म्हणजे सुरक्षित गिर्यारोहण करणारे साहसी गिर्यारोहक घडवणे! इतर सर्व खेळ प्रकारांत असते तसे कसलेही समाजिक वा आर्थिक पाठबळ नसताना आज ‘सॅक’ ही संस्था हे दिव्य पार पाडत आहे. सॅक ‘युवा सह्याद्री’ ही चळवळ राबवतेय. त्या चळवळीतून दर वर्षी, एक तरी गिर्यारोहक घडवण्याचा प्रयत्न असतो. वर्षभराच्या मोहिमांमध्ये त्याच्याकडून चांगलीच मेहनत करुन घेतली जाते व मग २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन एखाद्या सुळक्यावर साजरा होतो. त्या चढाईची सर्व सूत्रे या नवोदित गिर्यारोहकाकडे असतात. या प्रक्रियेमध्ये त्याचा आत्मविश्वास वाढतो व एक चांगला गिर्यारोहक घडवला जातो.

या २५ व्या वर्षानिमित्त एक विषेश मोहीम राबवली गेली. २६ जानेवारी २०२४ ते २६ जानेवारी २०२५ या एक वर्षात २५ सुळके आरोहणाचा साहसी कार्यक्रम आखला गेला. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर आठ महिन्यांत २५ सुळके! योजना तयार झाली. आरोहकांच्या दोन टीम तयार केल्या. जबाबदाऱ्याचे वाटप झाले. स्वत:च वर्गणी काढून आर्थिक बाजू सांभाळली गेली. या साहसातला पहिला सुळका माहुलीतल्या चिरा सुळक्याने श्रीगणेशा केला गेला. नंतरच्या आठ महिन्यात २३ सुळके चढले गेले. आणि २६ जानेवारी २०२५ रोजी सॅकने जुन्नर तालुक्यातील निमगिरी किल्ल्या समोरील मशेडी लिंगी सुळक्यावर यशस्वी चढाई केली. तसेच तळेरान २ हा सुळका अजिंक्य मार्गाने चढाई करून, संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या एका वर्षात महाराष्ट्रातील २५ सुळके सर करण्याचे आपले ध्येय पूर्ण केले.

या २६ जानेवारीची मोहीम वर्धापनदिनाची मोहीम असते. या मोहीमेत सर्व कुटुंबकबिल्यासहीत येण्याची मुभा असते. तळछावणी व सुळकाही तसाच निवडला जातो. ‘साहस हे सुरक्षित केले जाऊ शकते’ हे कुटुंबाला समजने चांगले असते. कॅंपवर येणाऱ्या लहानमुलांना व स्त्रीवर्गाला जवळच्या किल्ल्यावर नेऊन त्या साहसाची अनुभुती देखिल दिली जाते.

तसेच मोहिमेत काढलेली छायाचित्रे आणि साहसी मोहिमांवर तयार केलेली माहितीपटे यांच्या माध्यमातून गिर्यारोहणाचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न संस्थेकडून सतत केला जातो. त्याचसोबत गिर्यारोहण क्षेत्रात तरुण मुलामुलींनी यावे यासाठी संस्था अनेक ठिकाणी साहसी शिबिरे आयोजित करुन त्यांना सॅक ही संस्था प्रशिक्षणे देत असते. हल्ली ट्रेकिंग दरम्यान सतत अपघात होत असतात. अशा वेळी घटनास्थळी पोहचुन रेस्क्यूचे कामही संस्थेने केलेलं आहे.

या सर्वांची दखल म्हणून मुलुंड येथील गिरीसंमेलनात महेंद्र कुबल आणि महादेव गायकवाड यांना उत्कृष्ट प्रस्तरारोहक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर संतोष निगडे यांना सर्वोत्कृष्ट संघनेता म्हणून गौरव करण्यात आला. संस्थेची आणखीन जमेची बाजु म्हणजे महिलांची देखील गिर्यारोहण करणारी स्वतंत्र टीम आहे. त्यांनी सुद्धा स्वतंत्रपणे यशस्वी चढाया केल्या आहेत आणि सध्या त्या प्रत्येक मोहीमेत सपोर्ट टिम म्हणून कार्यरत ही असतात.

गिर्यारोहण क्षेत्रातील मुलभूत आणि प्रगत अभ्यासक्रम पुर्ण केलेला १५ जनांचा आरोहकांचा संघ सॅक कडे आहे. तसेच स्वयंपाक, छायाचित्रण, रसद व तळछावणी व्यवस्थापन, प्रथमोपचार, दळणवळण आदि बाबी सांभाळणारा २० जनांचा संघ मोहिमेसाठी नेहमी तयार असतो. नोकरीधंदा सांभाळून सॅकच्या शिलेदारांची ही वाटचाल सुरू आहे. इतक्या वर्षात सवंगडी बदलत गेले. परंतु संस्थेचा एकजीवपणा टिकून राहीला ते फक्त सह्याद्रीवरील प्रेमामुळे, साहसाच्या नशे मुळेच! सर्वांना समावेश करणारी ही संस्था. साहसी वीर कोणत्या संस्थेचा आहे याचा विचार ‘सॅक’ ने कधीच केला नाही. ‘सर्व गिर्यारोहक आपलेच’ हा स्थायीभाव! त्यामुळे इतर संस्थांच्या शिलेदारांना घेऊन सुद्धा बऱ्याच मोहिमा पार पाडल्या. हे सॅकचे वेगळेपण! सामाजिक बांधिलकीचा वसा सुद्धा साहसाच्या जोडीने येतो. त्र्यंबकरेंज मधील मेटघर गावातील शाळेला यथाशक्ती मदत सॅक करीत आहे.

सह्याद्रीचे गावकरी व हिमालयाची शेर्पा मंडळी यांच्या शिवाय सॅकचा हा साहसी प्रवास सुरू राहूच शकत नाही. या साहसी प्रवासात विशाल बजाज (जयपुर रोप), मालपाणी ग्रुप (संगमनेर), हर्षद मोरडे (मोरडे चॉकलेट्स), पेट्झेल (गिर्यारोहण साधने तयार करणारी कंपनी) यांची मदत वेळोवेळी झाली. सरते शेवटी, सह्याद्रीचे खरे गिरिमित्र श्री राजेश गाडगीळ यांनी नेहमीच मानसिक आधार दिला तसेच मोहिमांसाठी गिर्यारोहण सामुग्रीची सढळ हस्ताने मदत केली. या सर्वांसाठी संस्था कृतज्ञ आहेच, पण सॅक ला जेव्हा पन्नास वर्षे पुर्ण होतील, कित्येक मोहिमा पुर्ण होतील तेव्हा या सर्वांचे आभार नक्कीच व्यक्त करू कारण त्यांची मदत अजूनही लागणारच आहे ना? (Rock Climbing)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.