मुंबईसह राज्यात कोविड प्रतिबंधक नियमावलीनुसार, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवांची दुकाने व आस्थापने शनिवार व रविवारी बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश असूनही, मुंबईत दादरसारख्या विभागांमध्ये ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू होती. विशेष म्हणजे शासनाने रेनकोट, छत्री यासारख्या पावसाळी वस्तूंची विक्री करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानांबाहेर या वस्तू लटकवून, त्याआडून आपली दुकाने खुली ठेवत कपड्यांची विक्री करण्याचा प्रयत्न अनेक दुकानदारांकडून सुरू आहे.
अशी खुली होती दुकाने
राज्यात संध्याकाळी ५ नंतर जमावबंदी लागू करताना, सर्व दुकाने व आस्थापनांना ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु ही दुकाने ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी असली, तरी शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे इतर भागांमध्ये शनिवारी सर्व दुकाने सुरू असतानाच, दादर रेल्वे स्थानक परिसरातील सर्वच दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होती. अनेकांनी तर दुकानांबाहेर रेनकोट व छत्री अडकवून त्याआडून दुकाने खुली ठेवली होती. याआधारे अन्य वस्तूंची विक्री केली जात होती. विशेष म्हणजे ४ वाजता ही दुकाने बंद न होता, त्यानंतरही अर्धवट शटर खुली ठेवत वस्तूंची विक्री केली जात होती.
(हेही वाचाः दरड दुर्घटना: जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन झाले अलर्ट)
मॉल बंद, पण दुकाने सुरू
शनिवार व रविवारी मॉल्स, शॉपिंग सेंटर बंद ठेवण्याचे निर्देश असले, तरी दादरमधील नक्षत्र मॉल्समधील दुकाने सुरू होती. मॉल्समधील चादर विक्रेत्यांची दुकाने सुरू होती. मॉल्सच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या चादर विक्रेत्यांनीही बाहेर रेनकोट अडकवून, त्याआधारे आपली दुकाने खुली ठेवल्याचे पहायला मिळत होते. मॉल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने तेथील एकही दुकान सुरू असायला नको होते. पण या मॉलमधील चादरी विकेत्यांची दुकाने सुरू असल्याने, नक्की महापालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणा कितीसे दादरकडे गांभीर्याने पाहतात, असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.
फेरीवाल्यांचा स्थानकालाच विळखा
संध्याकाळी ४ वाजल्यानंतर सर्व दुकाने बंद करण्यात येत असली, तरी दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच फेरीवाले ठाण मांडून असतात. त्यामुळे प्रवाशांना स्थानकावर मोठ्या दिव्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात एकही फेरीवाला बसू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. परंतु रेल्वे स्थानकालाच विळखा घालणाऱ्या या फेरीवाल्यांवर ना महापालिका कारवाई करत, ना पोलिस. त्यामुळे एका बाजूला दुकानांवर निर्बंध लादताना फेरीवाल्यांना मात्र ढील दिली जात असल्यानेही, प्रवाशांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचाः एसटी कर्मचा-यांची प्रवाशांना मारहाण! बघा सीसीटीव्ही फुटेज)
Join Our WhatsApp Community