मागील वर्षात कोरोना महामारीमुळे सर्व धर्मीय सण-उत्सवांवर गडांतर आले होते, तसेच ते गणेशोत्सवावरही आले होते. त्यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला नव्हता, त्याची घोषणा सर्वात आधी लालबागचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली होती, यंदा मात्र लालबागचा राजा मंडळाने लाखो गणेशभक्तांना आनंदाची बातमी दिली आहे. यंदाच्या वर्षी लालबागचा राजा हा गणेशोत्सव साजरा करणार आहे, अशी घोषणा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी केली.
मूर्ती मात्र ४ फूट!
लालबागचा राजा म्हटले कि दरवर्षी दिसणारी तिच सिंहासनावर आरूढ झालेल, त्याच आकाराची, त्याच उंचीची आणि त्याच रूपाची मूर्ती गणेशभक्तांना आठवते. मात्र यंदा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने कोरोना संबंधी जे नियम ठरवून दिले आहे. त्याचे पालन करून त्याप्रमाणे गणेशेत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन नियमांमध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी ४ फुटाची गणेश मूर्ती बसवण्याची अट आहे. त्यामुळे यंदा लालबागचा राजा ४ फुटांचा असणार आहे. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. सध्याच्या कोरोना काळात अशी गर्दी टाळणे आवश्यक असल्याने त्याबाबतही मंडळाकडून आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन दर्शनाला प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
(हेही वाचा: आता एटीएम मधून पैसे काढणे महागणार! जाणून घ्या आरबीआयचे नवे नियम)
मागील वर्षी राबवलेला ‘आरोग्य उत्सव’
गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘आरोग्य उत्सव’ साजरा करून आदर्श निर्माण केला होता. यंदा गणेश भक्तांच्या विनंतीवरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. मंडळाने मागील वर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बहुतांश मंडळांनी त्याच प्रमाणे निर्णय घेतला होता. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लालबागचा राजा मंडळाची स्तुती केली होती.
Join Our WhatsApp Community