BMC Hospital : महापालिकेच्या रुग्णालयांचे होणार खासगीकरण; पाच रुग्णालये देणार खासगी संस्थांना?

235
BMC Hospital : महापालिकेच्या रुग्णालयांचे होणार खासगीकरण; पाच रुग्णालये देणार खासगी संस्थांना?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली दहिसर परिसरातील भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले असून या इमारतीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या रुग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. मात्र, या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले तरी याठिकाणी महापालिकेच्यावतीने आरोग्य सेवा दिली जाणार नसून खासगी सहभाग तत्वावर खासगी संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचा विचार सुरु आहे. भगवती रुग्णालयांसह एम पूर्व विभागातील ३०० खाटांची हस्तांतरीत होणारे रुग्णालय आणि विक्रोळीतील ३० खाटांच्या रुग्णालयांचेही खासगीकरण केले जाणार आहे. याशिवाय बोरीवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नॉस्टिक सेंटर आणि जाखादेवी येथील आरोग्य सुविधा केंद्राचेही खासगीकरण केले जाणार आहे. (BMC Hospital)

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी आरोग्य सेवांकरता सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पीपीपी धोरण राबवणार असल्याची घोषणा केली आहे. नागरिकांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात या करता महापालिका पीपीपी धोरण राबवणार असून विकास नियोजन आराखडा २०३४ अंतर्गत आरक्षित जमिनी, रुग्णालये, प्रसुतीगृहे, दवाखाने इत्यादीचा या धोरणाचा समावेश केला जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. (BMC Hospital)

(हेही वाचा – मराठी भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी महाराष्ट्र शासन सर्वप्रकारे सहकार्य करणार; Uday samant यांचे आश्वासन)

त्यानुसार, आर उत्तर विभागातील ४९० खाटांचे भगवती रुग्णालय, बोरीवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नॉस्टिक सेंटर, दादरमधील जाखादेवी आरोग्य सुविधा केंद्र, विक्रोळी पार्क साईट वरील ३० खाटांचे रुग्णालय आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिकेला हस्तांतरीत झालेले एम पूर्व विभागातील ३०० खाटांचे रुग्णालयांच्या वास्तू ३० वर्षांच्या करारावर आरोग्य सेवांकरता खासगी संस्थांना दिल्या जाणार आहे. यासाठी खासगी संस्थांकडून स्वारस्य अर्ज मागवले जात आहे. (BMC Hospital)

विशेष म्हणजे भगवती रुग्णालयाचे काम मागील आठ वर्षांपासून सुरु असून या भगवती रुग्णालयाच्या बांधकामासाठी सुमारे १ हजार कोटींच्या आसपास खर्च करण्यात येत आहे. या रुग्णालयाचे काम आतापर्यंत ९० टक्के पूर्ण झाले असून हे काम येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून हे रुग्णालय खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला जात आहे. महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या धोरणानुसार रुग्णांना करावा लागणारा खर्च आणि महापालिकेचा आवर्ती खर्च कमी होईल. (BMC Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.