-
प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने ७० हजार शासकीय पदांच्या भरतीचा निर्णय घेतला असून, त्यातील १८,८८२ पदांची भरती महिला व बालविकास विभागांतर्गत केली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी केली.
ही भरती एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत (ICDS) होणार असून, यात ५,६३९ अंगणवाडी सेविका आणि १३,२४३ अंगणवाडी मदतनीस पदे समाविष्ट आहेत.
भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान करण्याचे निर्देश
महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यासाठी १४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मुख्य सेविका पदासाठीही सरळसेवा भरती राबवली जाणार आहे. यासोबतच, राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिले.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारताने केले सराव सामने रद्द; थेट बांगलादेशविरुद्ध खेळणार)
बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महिलांच्या सशक्तीकरणाला गती मिळणार
या भरतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिला सशक्तीकरणाला चालना मिळणार असून, बालविकास योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, असा विश्वास तटकरे (Aditi Tatkare) यांनी व्यक्त केला.
महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक इच्छुक उमेदवारांना शासकीय सेवेत संधी मिळणार आहे, त्यामुळे या भरती प्रक्रियेवर सर्वांच्याच नजरा असणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community