
-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय खेळाडूंसाठी बीसीसीआयने (BCCI) एक आचारसंहिता काढली होती. तेव्हा अधिकृतपणे ती कधी बाहेर आली नाही. पण, तिची कलमं हळू हळू उघड झालीच. आणि त्यावर जोरदार चर्चाही झाली. त्यातील एक कलम होतं खेळाडूंबरोबर परदेश दौऱ्यात कुटुंबीयांना किती काळ एकत्र राहता येईल याविषयी. बीसीसीआयने या कलमाची कठोर अंमलबजावणी चॅम्पियन्स करंडकापासून (Champions Trophy 2025) सुरू केलेली दिसतेय. भारतीय संघ १५ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान दुबईत असेल. या दरम्यान खेळाडूंना पत्नी व मुलांना प्रवासातही बरोबर नेता येणार नाहीए.
ऑस्ट्रेलियातील १-३ अशा लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंसाठी १० कलमी आचारसंहिता लागू केली होती. आणि तिची अंमलबजावणी आता सुरू होत आहे. चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) हा पहिला परदेश दौरा आहे. दौरा ४५ दिवसांपेक्षा मोठा असेल तर खेळाडूंना २ आठवडे कुटुंबीयांबरोबर राहता येईल असा बीसीसीआयाच नवीन नियम आहे. ३० दिवसांच्या दौऱ्यासाठी १ आठवडा पत्नी व मुलांना आपल्याबरोबर हॉटेलमध्ये ठेवता येईल, असं हा नियम सांगतो. चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) १९ दिवसांचा असल्यामुळे ही सूट इथं मिळणार नाही.
(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचा बंगळुरूत सराव सुरू, जिममधून शेअर केला सेल्फी)
भारतीय संघाचा पहिला मोठा दौरा हा जूनमध्ये इंग्लंडला आहे. आणि तिथे पुन्हा एकदा खेळाडूंना पत्नी व मुलांना बरोबर नेता येईल. ‘याच काही बदल झाला तर माहीत नाही. पण, सध्यातरी खेळाडूंना आपली पत्नी, मुलं किंवा पार्टनरला दुबईत बरोबर नेता येणार नाही. एका ज्येष्ठ खेळाडूने याविषयी विचारणा केली होती. पण, बीसीसीआयकडून (BCCI) प्रवासाच्या नियमांवर बोट ठेवण्यात आलं. नियमांचं पालन होईल असं बीसीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केलं,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे.
भारतीय संघ १५ फेब्रुवारीला दुबईला पोहोचेल. संघ कुठलाही सराव सामना मुख्य स्पर्धेपूर्वी खेळणार नाही. २० तारखेला संघाचा मुकाबला बांगलादेशशी आहे. तर २३ तारखेला बहुचर्चित भारत – पाक लढत होईल. भारतीय संघाचा शेवटचा साखळी सामना २ मार्चला न्यूझीलंड विरुद्ध असेल. बाद फेरीत पोहोचल्यास ते सामनेही दुबईत खेळवले जातील. भारतीय संघाचे सर्व सामने हे दुबईत असतील. तर इतर संघ आपले साखळी सामने पाकिस्तानमध्ये (Pakistan) खेळणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community