‘झिका’चा महाराष्ट्रात प्रवेश! कुठे आढळला रुग्ण?

बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस झिका विषाणूची बाधा झाल्याचा निष्कर्ष 30 जुलै 2021 रोजी प्रयोगशाळेने दिला.

155

महाराष्ट्रात झिका विषाणू असलेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील पाच किलोमीटरमधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. झिकाचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस झिका विषाणूची बाधा झाल्याचा निष्कर्ष 30 जुलै 2021 रोजी प्रयोगशाळेने दिला. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. हा रुग्ण चिकनगुनियाने बाधित असल्याचेही स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

31 जुलै रोजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, सहाय्यक संचालक, हत्तीरोग डॉ. कमलापुरकर, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप या राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पथकाने सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना या भागात झिका रुग्ण आढळल्याने करावयाच्या कार्यवाही बाबत सूचना दिल्या.

(हेही वाचा : ‘फ्रेंडशिप डे’ आधीच मैत्रीला तडा!)

काय आहे झिका व्हायरस?

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत. झिका विषाणू हा 1947 मध्ये सर्वप्रथम आफ्रिका आणि एशियामध्ये आढळून आला होता. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. अशावेळी स्वत:ला डासांपासून दूर ठेवणे हा एकमेव उपाय आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.