-
प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असला, तरीही वरवर आघाडी टिकून आहे. मात्र, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात मतभेद उफाळण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेना उबाठाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, परंतु त्यांची मुदत येत्या ऑगस्टमध्ये संपणार आहे.
काँग्रेसचा विधान परिषदेतील दावा
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने (Congress) दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या काँग्रेसकडे विधान परिषदेत सर्वाधिक आठ सदस्य आहेत, तर शिवसेना उबाठाकडे सात आणि शरद पवार गटाकडे दोन सदस्य आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे काँग्रेसने हे पद मागितले आहे.
विधानसभेतील स्थिती आणि काँग्रेसचा तर्क
विधानसभेत महाविकास आघाडीतील सर्वाधिक आमदार शिवसेना उबाठाकडे आहेत. शिवसेना उबाठाचे २०, काँग्रेसचे १६ आणि शरद पवार गटाचे १० आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेना उबाठाला मिळू शकते, असा अंदाज आहे. जर विधानसभेत शिवसेना उबाठाला विरोधी पक्षनेते पद मिळाले, तर विधान परिषदेमध्ये काँग्रेसने हे पद मागणे स्वाभाविक असल्याचा काँग्रेसचा (Congress) युक्तिवाद आहे.
(हेही वाचा – NICB मध्ये १२२ कोटी रुपयांचा बँक घोटाळा; बँकेच्या महाव्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल)
आघाडीत तणाव वाढणार?
विरोधी पक्षनेते पदावरून शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये (Congress) चर्चेचे सत्र सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यावर अंतिम निर्णय अजून झालेला नाही. मात्र, काँग्रेसने ठाम भूमिका घेतल्यास महाविकास आघाडीतील तणाव वाढू शकतो.
विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी
दरम्यान, काँग्रेसने (Congress) प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड केली असून, विजय वडेट्टीवार यांना विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वडेट्टीवार यांना यापूर्वी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा अनुभव आहे, त्यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस अधिक आक्रमक भूमिका घेईल, असे मानले जात आहे.
(हेही वाचा – नदीजोड प्रकल्पाच्या कामांसाठी आवश्यक परवानग्या लवकर मिळवाव्यात; मंत्री Radhakrishna Vikhe-Patil यांच्या सूचना)
विधान परिषद सदस्यसंख्या आणि निवड प्रक्रिया
- ३० सदस्य हे विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात.
- २२ सदस्य विविध स्थानिक प्राधिकरणांमार्फत निवडले जातात.
- ७ सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून निवडून येतात.
- ७ सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निवडले जातात.
- राज्यपालांकडून १२ सदस्यांची नियुक्ती केली जाते.
आगामी राजकीय घडामोडींकडे लक्ष
विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना उबाठामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत विधान परिषदेतील राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community