पोलादपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम डोंगरात वसलेल्या केवनाळे गावात शेजारच्या मुक्या महिलेच्या दोन महिन्याच्या बाळाला वाचविताना १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरच्या पायावर घराची अर्धी भिंत कोसळून एक पाय निकामी झाला होता. साक्षीने जीव धोक्यात घालून त्या बाळाला वाचविण्याचे जे धाडस दाखविले त्या धाडसाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन तिची २ ऑगस्ट २०२१ रोजी भेट घेतली, आस्थेने विचारपूस केली. त्यासोबतच मदतीचा हात म्हणून महापौर किशोरी पेडणेकर व आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांनी या मुलीला एक लाख रुपयांचा रोख निधी आर्थिक मदत म्हणून तिच्या सुपूर्द केला. तसेच नगरसेवक अनिल कोकिळ यांनी २५ हजारांचा धनादेश दिला. याप्रसंगी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख व संबंधित डॉक्टर उपस्थित होते.
(हेही वाचा : लोकल प्रवासाबाबत उच्च न्यायालयाचा काय आहे आदेश?)
साक्षीला महापालिका पुन्हा उभे करणार
महापौर किशोरी पेडणेकर साक्षीला आईच्या मायेने धीर देताना म्हणाल्या की, ज्याप्रमाणे हिमतीने तू बाळाला वाचविले आहे. तीच हिम्मत तू आताही कायम ठेव. तुझ्यावर केईएम रुग्णालय संपूर्णपणे मोफत उपचार करणार असून प्रारंभी जयपुर फुट व त्यानंतर बारा लक्ष रुपये खर्च करून जर्मनीच्या ऑटोबोक कंपनीचे सारबो रबर पाय मोफत बसविणार असल्याचे सांगितले. तू पूर्वीप्रमाणेच धावण्याच्या शर्यतीत सहभागी होऊ शकणार, असा तिला धीर दिला. यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महापौर म्हणाल्या की, साक्षीसारख्या हिंमतवान मुलीची आज समाजाला गरज असून ती हिमतीने उभे राहील, असा मला आत्मविश्वास आहे. साक्षीच्या संपूर्ण उपचाराचा खर्च केईएम रुग्णालय मोफत करणार असून तिला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी डॉक्टर संपूर्ण लक्ष ठेवून असून ती पूर्वीसारखीच चालेल, धावेल असा विश्वास असल्याचे महापौरांनी सांगितले. साक्षीने माणुसकीचे दर्शन घडविले असून गावागावात आजही चांगले संस्कार होत असल्याचे या घटनेवरून सिद्ध होत असल्याचे महापौरांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community