स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक, प्राचार्य आणि विद्यार्थीवर्गात अत्यंत प्रिय शिक्षक डॉ. प्र.ल. गावडे यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे पुणे येथे वास्तव्य होते. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात केलेल्या कामगिरीवरून ते सदैव स्मरणात राहतील.
डॉ. गावडे हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपकार्यवाह, तीन वर्षे कार्यवाह आणि सहा महिने सल्लागार म्हणून कार्यरत होते. शिक्षकतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी १९६८ मध्ये पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी संपादन केली. त्यासाठी ‘सावरकर : एक चिकित्सक अभ्यास’ हा प्रबंध त्यांनी सादर केला होता. या प्रबंधास पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘न.चिं. केळकर पारितोषिक’ व ‘परांजपे पारितोषिक’ (१९७०) मिळाले. या प्रबंधास (१९७१ – ७२) ला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला. वीर सावरकरांच्या साहित्यातून वीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे उज्ज्वल दर्शन कसे घडते, ते दाखविणे हा प्रबंधाचा मुख्य विषय होता. आणि आपला हेतू डॉ. गावडे यांनी उत्तम रीतीने सिद्धीस नेला. अभ्यासपूर्ण शैलीने हा प्रबंध लिहून मराठी टीकावाङ्मयात मोलाची भर टाकली.
(हेही वाचा : राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये निर्बंध झाले शिथिल! असे आहेत नवीन नियम)
संत साहित्याचे अभ्यासक!
डॉ. गावडे हयांनी ‘कवी यशवंत – काव्यरसग्रहण’ आणि ‘सावरकरांचे साहित्यविचार’ ही स्वतंत्र पुस्तके लिहिली आहेत. संतसाहित्य हा डॉ. प्र.ल. गावडे यांच्या संशोधनाचा चिंतनाचा विषय होता. याच विषयामधील ‘श्री तुकाराम गाथा’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘श्री ज्ञानेश्वर वाङ्मय सूची’ व ‘श्रीनामदेवकृत श्री ज्ञानेश्वर समाधी अभंग’ या त्यांच्या संपादित पुस्तकांचे प्रकाशन ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी’ यांनी केले आहे.
वीर सावरकरांच्या साहित्याचे निस्सीम भक्त!
हिंदु धर्म, हिंदुजाती, भारताचे स्वातंत्र्य, हिंदुसंघटन यांच्या हिताविरुद्ध कोणी विचार मांडले, तर वीर सावरकर किती जळजळीत शब्दांत त्याचा निषेध करीत, त्या वेळी त्यांच्या उपरोधाला किती तिखट धार चढे हे सर्वांना माहीतच आहे. पण तरीही वीर सावरकर अत्यंत विवेकनिष्ठ होते हे तितकेच खरे आहे. यासंबंधी चर्चा करताना डॉ. गावडे यांनी स्वतः वीर सावरकरांचे व त्यांच्यासंबंधी इतरांचे उद्गार उद्धृत करून या दोन वृत्ती त्यांच्या ठायी अविरोधाने कशा नांदत होत्या ते डॉ. गावडे यांनी चांगल्या रीतीने विशद केले. डॉ. गावडे यांच्या मनात वीर सावरकर यांच्या साहित्याबद्दल गाढ भक्ती होती. या थोर पुरुषाविषयी त्यांच्या मनात निस्सीम आदर होता. ‘सावरकर : एक चिकित्सक अभ्यास’ या ग्रंथास मिळालेल्या पारितोषिकाशिवाय डॉ. प्र.ल. गावडे यांना विविध सन्माननीय पुरस्कार मिळालेले आहेत. ‘आदर्श शिक्षक – राज्य पुरस्कार’(१९७६), ‘उत्कृष्ट साहित्य समीक्षेबद्दल ‘पु. भा. भावे स्मृति समितीचा’ पुरस्कार (१९९७), ‘सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल अॅड. डी. आर. नगरकर पुरस्कार’, ‘शैक्षणिक कार्याबद्दल राजा मंत्री पुरस्कार’, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे कृतज्ञता पुरस्कार’ (१९९८) आणि ‘विचार प्राथमिक शिक्षणाचा’ या पुस्तकास म. सा. परिषदेचे ‘ना. गो. चाफेकर पारितोषिक’ (१९९८) अशा विविध पुरस्कारांनी डॉ. प्र.ल. गावडे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
Join Our WhatsApp Community