महापालिकेचा आदिवासी पाड्यांमध्येही लसीकरणावर भर!

आदिवासी पाड्यासह वरळी कोळीवाडा नजीकचे आदर्श नगर आणि शीव परिसरातील प्रतिक्षा नगर आदी ठिकाणीही लसीकरण केंद्रांचे लोकार्पण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते पार पडले.

244

मुंबईत लसीकरणावर भर देणाऱ्या महापालिकेने आता दुर्लक्षित असलेल्या आदिवासी पाड्यांकडेही लक्ष वेधले आहे. सोमवारी गोरेगाव पूर्व परिसरातील आरे कॉलनी येथील वन परिसरात असणाऱ्या खांबाचा पाडा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी लसीकरण केंद्र खुली करून आदिवासी समाजातील नागरिकांचेही लसीकरण करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.

खांबाचा पाड्यात लसीकरणाची जबाबदारी महापालिकेने घेतली

गोरेगाव पूर्व येथील आरेमधील खांबाचा पाडा या आदिवासी पाड्यातील लसीकरण केंद्राचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री तथा उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. खांबाचा पाडा लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळासह लस साठ्याची संपूर्ण व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. याठिकाणी ५० हजार लसीकरणाची क्षमता असेल. या लोकार्पण प्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू, आमदार रमेश लटके, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, नगरसेविका रेखा रामवंशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सह आयुक्त भारत मराठे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, ‘पी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी (प्रभारी) मंगला गोमारे मान्यवर, संबंधीत अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक हे उपस्थित होते.

(हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक डॉ. प्र.ल गावडे यांचे निधन)

११ आदिवासी पाड्यांमधील ९७५ आदिवासींनी लसीकरणात भाग घेतला!

तर अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार व परिमंडळाच्या उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आर दक्षिण आणि आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी पुढाकार घेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आदिवासींकरता लसीकरण केंद्राची उभारण्यात आले आहे. दिवसभरात मोठ्या संख्येने येथील ११ आदिवासी पाड्यांमधील ९७५ आदिवासींनी लसीकरणात भाग घेतला. याप्रसंगी आर मध्य व आर दक्षिण विभागा प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता पाटेकर, परिमंडळ उपायुक्त भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त मृदुला अंडे, स्थानिक नगरसेविका गीता शिगवण आदींसह महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

खासगी संस्थांच्या सहकार्याने शीव आणि वरळीत लसीकरण केंद्र

आदिवासी पाड्यासह वरळी कोळीवाडा नजीकचे आदर्श नगर आणि शीव परिसरातील प्रतिक्षा नगर आदी ठिकाणीही लसीकरण केंद्रांचे लोकार्पण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते पार पडले. या दोन्ही ठिकाणची लसीकरण केंद्र ही मुंबई महानगरपालिका व रिलायन्स फाऊडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरु करण्यात आले आहे.  या लोकार्पण प्रसंगी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मोफत लसीकरणासाठी खासगी रुग्णालये व संस्था यांनी पुढे यावे. यामुळे लसीकरणाची संख्या व वेग वाढून आपल्याला लवकरात-लवकर आणि अधिकाधिक लोकांचे लसीकरण करणे शक्य होईल. सद्यस्थितीत लसीकरणाचे महाराष्ट्रातील आकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, तब्बल १ कोटी नागरिकांनी दोन्ही डोस घेतल्याचा टप्पा देशभरातील राज्यातून सर्वप्रथम महाराष्ट्राने गाठला आहे. त्यासोबतच इतर राज्यांनीही लसीकरण झपाट्याने पूर्ण करणे गरजेचे आहे. जोपर्यत सगळ्यांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. इतर देशांची उदाहरणे बघितले असता लशीच्या २ मात्रा घेतल्यानंतरही मास्क लावणे आवश्यक आहे. कारण कोरोना अजूनपर्यंत पूर्णपणे गेलेला नाही.त्यामुळे सर्वांनी आपापल्या स्तरावर काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहनही ठाकरे यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.