- दीपक कैतके
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय त्यांच्या स्वाधीन करून या प्रकरणात आपण हतबल आहोत, हे दाखवून दिले आहे. एकेकाळी स्पष्टवक्तेपणा आणि कठोर निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार आता स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असूनही आपल्या एका मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडू शकत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे. कधीकाळी त्यांनी अनेक सहकाऱ्यांना कठोर निर्णयांमुळे अडचणीत आणले होते. आर.आर. पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांसारख्या नेत्यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा फटका बसला होता. मग आज तेच दादा (Ajit Pawar) धनंजय मुंडे यांच्या बाबतीत एवढे नरम कसे?
बीडच्या घटनेमुळे महाराष्ट्राची संपूर्ण देशभर नाचक्की झाली आहे. एका सत्ताधारी पक्षाच्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली आणि त्यावरून मोठे राजकीय वादळ उठले. एवढ्या गंभीर प्रकरणावर अजित पवार (Ajit Pawar) शांत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर एवढ्या मोठ्या आरोपांचे सावट असताना ते गप्प का? त्यांच्या स्वतःच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना चुकीच्या निर्णयांसाठी जबाबदार धरले गेले आहे, मग यावेळी ते कोणत्या दबावामुळे धनंजय मुंडे यांना संरक्षण देत आहेत?
भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्यांसाठी आक्रमक भूमिका घेत. भ्रष्टाचार, नैतिक मुद्दे किंवा अन्य कोणत्याही कारणावरून त्यांनी विरोधी पक्षातीलच नव्हे, तर आपल्या पक्षातीलही नेत्यांना हटवले. मग आता, जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातीलच एका मंत्र्याने इतक्या मोठ्या वादळाला तोंड द्यावे लागत आहे, तेव्हा त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात त्यांना अडचण का येते आहे?
(हेही वाचा अदानी आणि उत्थान समुहाचा BMC School मधील मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पुढाकार)
बीडमधील प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका सत्ताधारी पक्षाच्या सरपंचाचा मृत्यू ही काही छोटी घटना नाही. सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. एवढेच नव्हे, तर या प्रकरणात भाजप आमदार धस यांनी मध्यस्थी केल्याचेही समोर आले. पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या होऊनही भाजपने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली नाही, ही बाब लक्षवेधी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील या विषयावर मौन बाळगून आहेत. त्यामुळे या प्रकरणात पक्षाने कोणत्या बाजूने भूमिका घेतली आहे, हे स्पष्ट होत नाही.
महाराष्ट्रातील जनतेला नेत्यांची अशी वागणूक किती दिवस सहन करावी लागणार? जनता एवढ्या मोठ्या घडामोडींवर गप्प का आहे? या प्रकरणात स्पष्टपणे काहीही घडताना दिसत नाही, आणि त्यामुळे लोकांच्या मनात सरकारच्या निष्क्रियतेबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊनही सरकार योग्य ती पावले उचलत नाही, ही गंभीर बाब आहे.
सत्ताधारी पक्षात दबावाची राजकारण खेळले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी पक्षाने माघार घेतली आहे का? अजित पवार (Ajit Pawar) यांना हे प्रकरण हाताळण्यात कोणती अडचण येते आहे? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.
याशिवाय, विरोधकांनीही या प्रकरणात प्रभावी भूमिका घेतलेली दिसत नाही. मागील काळात विरोधी पक्ष अशा प्रकरणांवर आक्रमक असायचा, मात्र यावेळी त्यांनी फारसा आवाज उठवलेला नाही. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणाला पुढे न्यायचे नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. विरोधकांनी संपूर्ण ताकद लावून सरकारला जाब विचारला पाहिजे, पण तशी परिस्थिती दिसत नाही.
एकूणच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेली भूमिका, भाजपच्या नेत्यांनी दाखवलेली संमिश्र प्रतिक्रिया आणि विरोधकांचा कमी झालेला आक्रमकपणा हे सर्व पाहता, या प्रकरणात एक वेगळेच राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रातील जनता हे राजकारण समजून आहे. मात्र, हे प्रकरण कुठपर्यंत जातं आणि त्याचा पुढील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community