Vaibhav Naik यांच्यासाठी Shiv Sena आणि UBT मध्ये रस्सीखेच!

93
Vaibhav Naik यांच्यासाठी Shiv Sena आणि UBT मध्ये रस्सीखेच!
  • सुजित महामुलकर

गेले काही दिवस शिवसेना उबाठाला कोकणात एकावर एक मोठे धक्के बसत आहेत. राजन साळवी, गणपत कदम, सुभाष बने या माजी आमदारांनंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना गळाला लावण्याचे प्रयत्न एकीकडे सुरू आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून नाईक यांना रोखण्यासाठी प्रयत्नांची परकष्टा होत असल्याचे दिसून येते. एकूणच शिंदे-ठाकरे यांच्याकडून कोकणच्या बालेकिल्ल्यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते.

नाईक शिवसेनेत प्रवेश करतील?

राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार असून एकनाथ शिंदे महायुतीचा एक घटक आहे. सध्या वैभव नाईक (Vaibhav Naik) यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे नारायण राणे हे भाजपाचे खासदार असून त्यांचे दोन्ही पुत्र आमदार आहेत. नितेश राणे तर फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी जरी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तरी त्यांना राणे यांच्यासोबत जुळवून घेणे भाग आहे. याच कारणाने नाईक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

(हेही वाचा – Shiv Jayanti 2025 : शिवजयंतीच्या दिवशी राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली; भाजपाने दिला इशारा)

भरदिवसा हत्या

वैभव नाईक (Vaibhav Naik) आणि नारायण राणे यांचे वैर आताचे नाही तर गेल्या ३५ वर्षांपासूनचे आहे. वैभव नाईक यांचे चुलते श्रीधर नाईक हे १०८०-९० च्या दशकात कोंगसचे सक्रिय नेते होते. शिवसेनेने कोकणात पाय रोवायला सुरुवात केली होती. त्यात बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर कोकणची जबाबदारी दिली आणि त्यानंतर जून १९९० मध्ये श्रीधर नाईक यांची भरदिवसा हत्या झाली. या हत्येत नारायण राणे यांचा हात असल्याचा आरोप नाईक कुटुंबीयांनी वेळोवेळी केला. कोर्ट कचेरी झाली, मात्र पुराव्याअभावी नारायण राणे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

वैयक्तिक-राजकीय वैर

त्यानंतरही वैभव नाईक (Vaibhav Naik) आणि राणे यांच्यात विस्तव जात नव्हता. नाईक आणि राणे यांचा निवडणुकीत वेळोवेळी सामना झाला. २००९ मध्ये कुडाळ विधानसभा मतदारसंघातून राणे यांनी नाईक यांचा पराभव केला, तर त्यानंतर २०१४ मध्ये नाईक यांनी राणे यांना पराभूत केले. २०१९ मध्येही नाईक यांनी विधानसभा मतदारसंघातून राणे समर्थक रणजित देसाई यांचा पराभव करून मतदारसंघ आपल्याकडे राखला. २०२४ मध्ये मात्र राणे यांचे पुत्र, माजी खासदार निलेश राणे यांनी नाईक यांना धूळ चारली.

(हेही वाचा – PVR-INOX ने जाहिराती दाखवून वेळ फुकट घालवल्याबद्दल खटला केला दाखल ; न्यायालयाने काय म्हटले?)

कोकणातील राजकारणात एकटे

नाईक (Vaibhav Naik) यांचा कोकणात पराभव झाला आणि सध्या उद्धव ठाकरे यांच्या उबाठा पक्षाचेदेखील कोकणातील अस्तित्व धोक्यात आले आहे. कोकणात उबाठाचे एकमेव आमदार भास्कर जाधव निवडून आले. तेही पक्षात नाराज असल्याचे त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट होते. त्यामुळे वैभव नाईक (Vaibhav Naik) सध्या कोकणातील राजकारणात एकटे पडले असून त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरू आहे. नुकतीच नाईक आणि त्यांच्या पत्नीची ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली.

राजकीय स्थैर्यासाठी तडजोड क्रमप्राप्त

अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून आपले राजकीय आणि वैयक्तिक शत्रुत्व कुरवाळत बसणे वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना भविष्यात परवडणारे नाही. तर यातून मार्ग काढायचा असल्यास एकमेव मार्ग म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश. हा प्रवेश झाल्यास नाईक यांना राजकीय स्थैर्य मिळवण्यासाठी काही तडजोड करावी लागणे क्रमप्राप्त आहे, ती म्हणजे राणे कुटुंबासोबत जुळवून घेणे.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारतीय संघात बेबनाव? स्टार यष्टीरक्षक गंभीरवर चिडला?)

फायदा कोणाचा, नुकसान कोणाचे?

वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास एकनाथ शिंदे यांची कोकणातील ताकद वाढण्यास मदत होईल. कोकणात भाजपाने पूर्ण जोर लावला असला तरी भाजपाची संपूर्ण भिस्त ही केवळ राणे कुटुंबावर अवलंबून आहे. याउलट शिंदे यांची ताकद तळागळापर्यंत पोहोचली आहे. यांचा फायदा शिंदे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झाला तर आश्चर्य वाटू नये. तसच भविष्यात शिंदे यांची ताकद वाढल्याने भाजपाला शिंदे यांच्यावर दबाव टाकताना विचार करावा लागेल, असे म्हटल्यास अतिशयोक्ति ठरू नये.

ठाकरेंचे नुकसान

नाईक यांच्या शिंदे गटात जाण्याने उद्धव ठाकरे यांचे मात्र मोठे नुकसान होईल यात शंका नाही. कोकणात निवडून येणारा एकमेव लोकप्रिय चेहेरा ठाकरे गमावून बसतील. भास्कर जाधव आज आमदार म्हणून निवडून आले असले तरी भविष्यात ते विधानसभा निवडणूक लढणार नाहीत, असे त्यांनी याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे ठाकरे यांच्याकडून वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना समजावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे तर दुसरीकडे शिंदे यांच्याकडून नाईक यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रचंड ताकद लावली जात असल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.