-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्याचे दुग्ध विकासमंत्री अतुल सावे यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच गोरेगाव पूर्व येथील विविध ठिकाणांची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून येथील भागाचा आढावा घेतला. विशेष म्हणजे या पाहणी दौऱ्यामध्ये मंत्री अतुल सावे यांच्यासोबत भाजपाचे आमदार मुरजी पटेल आणि शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) जोगेश्वरीचे आमदार बाळा नर हे उपस्थित होते. या पाहणीपूर्वीच महायुतीचे खासदार रविंद्र वायकर हे मंत्री सावे यांना भेटून निघून गेले. त्यामुळे मंत्र्यांच्या भेटीमागे वेगळीच चर्चा ऐकायला मिळत असून नर यांच्या उपस्थितीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी आरेचा कायापालट करण्याच्या दृष्टीकोनातून घेतलेल्या आढावा बैठकीत खासदार रविंद्र वायकर हे उपस्थित नसणे यामुळेच उलटसुटल चर्चा ऐकायला मिळत आहे. वायकर हे महायुतीचे खासदार असताना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात उपस्थित न राहता केवळ निवेदन देऊन निघून जाणे हे विभागातील जनतेला रुचलेले नाही. वायकर हे जोगेश्वरीचे माजी आमदार राहिलेले असून त्यांनी सातत्याने आरेती प्रश्नाबाबत आवाज उठवला आहे तसेच आरेतील बांधकामामुळेच त्यांच्या विरोधातील तक्रारींमुळे मानसिक त्रासही सहन करावा लागला होता, त्यातच दुग्ध विकासमंत्री अतुल सावे यांच्या बैठकीला त्यांची अनुपस्थिती लागणे हे विभागातील जनतेला खटकले आहे.
(हेही वाचा – Metro Line 3 ही मार्च अखेरपर्यंत सेवेत येण्याची शक्यता)
एका बाजूला रविंद्र वायकर हे मंत्र्यांना निवेदन देऊन निघून जातात आणि शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) जोगश्वरीचे आमदार बाळा नर या बैठकीला उपस्थित राहतात यामागे मोठे राजकारण असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे. बाळा नर यांना या बैठकीला उपस्थित राहता यावे याकरताच वायकर हे मंत्र्यांना निवेदन देऊन निघून गेले असावेत अशीही शंका उपस्थित केली जात आहे. वायकर यांनी यानंतर सोशल मिडियावर पोस्टकरून मंत्र्यांना निवेदन दिल्याचे म्हटले आहे, त्यात त्यांनी आरेतील अनधिकृत बांधकामांचे वाढणारे प्रमाण, रॉयल पाम येथे बांधण्यात येणारा पाण्याच्या टाकीचा प्रश्न, आरेच्या सर्वच रस्त्यांवर दिवे लावणे, पिकनिक उद्यानाचा विकास करणे, आरे तलावाचे सुशोभीकरण, आरे चेकनाका जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान व हुतात्मा तुकाराम ओंबळे उद्यान हे देखभालीसाठी देणे, आरे रुग्णालय मनपाच्या ताब्यात देणे, आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात असल्याचे माहिती दिली.
सध्या शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) आमदार गळाला लावण्याची मोहिम ही घेण्यात आली असून या मोहिमेचाच हा भाग नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत बाळा नर यांचीशी संपर्क केला असता त्यांनी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांचा पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. मी या भागाचा लोकप्रतिनिधी असून आरेचे पर्यटनस्थळ व्हावे यासाठी मी मागणी केली आहे आणि सरकारमध्ये मंत्रीच हेच निर्णय घेत असल्याने जनतेच्या प्रश्नासाठी मंत्र्यांसोबत बैठकीला उपस्थित राहिलो यामुळे कुणाच्या भुवया का उंचावाव्यात? स्थानिक खासदार या आढावा बैठकीला का उपस्थित राहिले नाहीत आणि केवळ भेटून काही क्षणात का निघून गेले यात तुम्हाला राजकारण दिसत नाही का असाही सवाल केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community