माजी मंत्री Abdul Sattar यांचा अनुदान घोटाळा; राजकीय वर्तुळात खळबळ

96
माजी मंत्री Abdul Sattar यांचा अनुदान घोटाळा; राजकीय वर्तुळात खळबळ
  • प्रतिनिधी

तत्कालिन एकनाथ शिंदे सरकारमधील वादग्रस्त माजी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या शिक्षण संस्थांना शासकीय निधीच्या वाटपावरून राजकीय वातावरण तापले आहे. स्वतःच्या संस्थांना नियम वाकवून लाखो रुपयांचे अनुदान दिल्याचा आरोप त्यांच्यावर होत असून, यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे.

सत्तार यांचा निधी घोटाळा?

अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी पायाभूत सुविधा पुरवण्याच्या योजनेत सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठा फेरफार केला. याआधी या योजनेंतर्गत संस्थांना वार्षिक कमाल २ लाख रुपये अनुदान मिळत होते. मात्र, मंत्रिमंडळाच्या विशेष मान्यतेने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी हे अनुदान १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले.

विशेष म्हणजे, या वाढीव अनुदानाच्या निर्णयानंतर अवघ्या पाच दिवसांतच छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ९ ऑक्टोबर रोजी सत्तार (Abdul Sattar) यांच्या संस्थांसाठी १ कोटी ६० लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठवला. तत्काळ मंजुरी मिळवून १० ऑक्टोबर रोजी निधी वितरित करण्यात आला.

(हेही वाचा – Eknath Shinde यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी ; तपास सुरू)

राजकीय आरोप-प्रत्यारोपांची लाट

या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना उबाठा आणि काँग्रेसने या अनुदान वाटपाला “मंत्रिपदाचा दुरुपयोग” आणि “सरकारी तिजोरीची लूट” असे संबोधले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, भाजपाच्या काही नेत्यांनीही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली असून, यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचे म्हटले आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यासाठी हा विषय राजकीय डोकेदुखी ठरू शकतो.

(हेही वाचा – अल्पसंख्याक शाळा मान्यतेबाबतच्या निर्णयाला CM Devendra Fadnavis यांची स्थगिती)

सत्तार यांचे वादग्रस्त मंत्रीपद

२०१९ ते २०२४ या काळात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे मंत्रीपद वादग्रस्त राहिले आहे. कृषी मंत्री असताना त्यांचे खाते काढून घेण्यात आले होते. त्यानंतर अल्पसंख्याक खात्यातही त्यांच्यावरील आरोप कायम राहिले. अखेर फडणवीस सरकारमध्ये त्यांचे मंत्रिपद कापण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चौकशी होणार? की राजकीय बचाव?

सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपांमुळे राज्य सरकार दबावात आले आहे. सरकार या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करणार की राजकीय गणित सांभाळत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.