सध्या महविकास आघाडीत आक्रीत घडताना दिसत आहे. एका बाजुला शिवसेनेचे नेते संजय राऊत हे दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी जवळीक साधत आहेत. त्यांच्याशी वारंवार चहापान करत आहेत. त्यांच्याशी घट्ट मैत्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे त्याच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राहुल गांधींचे विश्वासू नाना पटोले यांनी मात्र शिवसेना फोडून काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा धडाका लावला आहे. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, अशी भाषा करून शिवसेना आणि राष्ट्रवादीला डिवचणाऱ्या नाना पटोले यांनी आता शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्याला काँग्रेसमध्ये प्रवेश देत जोर का धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकलेल्या माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत अशोक शिंदेंनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा झेंडा हाती धरला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मोहन जोशी, रणजितसिंह देशमुख या नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.
म्हणून शिवसेना सोडली!
अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. माजी राज्यमंत्री असलेल्या शिंदेंकडे शिवसेनेचे उपनेतेपद होते. 1995 मध्ये शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले होते. मात्र पक्षाकडून मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर डावलले गेल्यामुळे ते नाराज होते. गेल्याच महिन्यात त्यांनी शिवसेनेचा हात सोडला होता.
शिवसेनेच्या माजी खासदारासोबत तीव्र मतभेद
शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याने शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कोण आहेत अशोक शिंदे?
- अशोक शिंदे हे वर्ध्यातील हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार
- 1995, 1999 आणि 2009 असे तीन वेळा शिवसेनेकडून आमदार
- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून पराभव
- मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शिंदेंकडे राज्यमंत्रिपद
- अशोक शिंदेंकडे शिवसेनेचे उपनेतेपद होते, जुलैमध्ये पक्षाला रामराम