Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती ही सावरकर निष्ठांची मांदियाळी

48
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती ही सावरकर निष्ठांची मांदियाळी
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती ही सावरकर निष्ठांची मांदियाळी
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

विचार करा, जर तुम्हाला असे वरदान मिळाले की तुम्ही ज्या वस्तूला हात लावाल ती सोन्याची होईल, तर तुम्ही काय कराल? यावरुन तुम्हाला जुनी कथा आठवली असेल, ज्यामध्ये एका राजाला असे वरदान मिळते आणि शेवटी त्याच्या प्रिय कन्येला तो स्पर्श करतो आणि ती सोन्याची होते. खरंतर ही कथा म्हणजे शोकांतिका आहे. मात्र प्रत्यक्षात अशी एक गोष्ट अस्तित्वात आहे. जिचा स्पर्श झाल्याने आपल्या आयुष्याचे सोने होते. ती गोष्ट म्हणजे सावरकर संस्कार. सावरकरांचे संस्कार हे जणू एक वरदानच आहे आणि सावरकर संस्कारांचा स्पर्श ज्यांना ज्यांना झाला आहे, त्यांच्या आयुष्याचे सोने झाले आहे. इतकेच नव्हे तर अशा लोकांनी समाजात पहाडाएवढे काम करुन ठेवले आहे, ज्याचा लाभ पुढच्या पिढीला होणार आहे. म्हणूनच सावरकर संस्कार झालेल्या लोकांना ‘स्वर्ण स्पर्श’ करण्याचे वरदान प्राप्त झाले आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. (Veer Savarkar)

‘सावरकरी’ या स्तंभामध्ये आज आपण अशाच संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, नागपूर (Nagpur) ही संस्था गेली अनेक वर्षे सावरकरांच्या विचारांचा जागर करीत आहे. संस्थेच्या वतीने १९८३ साली शंकरनगर चौक, नागपूर (Nagpur) येथे सावरकरांच्या (Veer Savarkar) पुतळ्याची स्थापना झाली. या प्रसंगी बाळासाहेब देवरस (Balasaheb Deoras) आणि सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या वतीने २६ फेब्रुवारी आणि २८ मे रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सावरकरांच्या पुण्यथितीला ‘सावरकर गौरव पुरस्कार’चे आयोजन केले जाते. आतापर्यंत अनेक दिग्गजांना सावरकर गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामध्ये बाळासाहेब देवरस, विक्रमराव सावरकर, मोरोपंत पिंगळे, दत्तोपंत ठेंगडी, कर्नल सुनील देशपांडे, मा. गो. वैद्य, जांबुवंतराव धोटे आणि अशा अनेक श्रेष्ठ व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला आहे. (Veer Savarkar)

(हेही वाचा – BKC मध्ये लवकरच रुग्णालय, महाविद्यालय उभे राहणार)

तात्यारावांच्या नाटकांतील, साहित्यातील महिला ह्या अबला नसून सबला आहेत. ‘आता शरण नव्हे रण, मारित मारित मरण’ असे म्हणत रणांगणात उतरणारी स्त्री सावरकरांना अपेक्षित आहे. हाच विचार समोर ठेवून समितीतर्फे कर्तृत्ववान महिलांना ‘तेजिनिधी महिला पुरस्कार’ प्रदान केला जातो. तसेच आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचाही सत्कार केला जातो. ८ जुलै म्हणजेच सावरकरांच्या साहस दिनानिमित्त वेगवेगळ्या शाळांमध्ये व्याख्याने आयोजित केली जातात, तसेच सावरकरांची प्रतिमा भेट दिली जाते. नागपूरातील सी. पी. अँड बेरार महाविद्यालयात समितीतर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. (Veer Savarkar)

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, नागपूर या संस्थेचे उल्लेखनीय कार्य म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी सावरकरांचा विचार सर्वदूर पोहोचवला, विदर्भातील अशा ९० जणांच्या कार्याची दखल घेऊन समितीने ‘विदर्भातील सावरकर निष्ठांची मांदियाळी’ हे पुस्तक प्रकाशित केले. अशा पुस्तकांची समाजाला नितांत आवश्यकता आहे. कारण सावरकरांचे सबंध जीवन प्रतिकूलतेवर आधारित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी लढा दिला. प्रतिकूलतेची ही गडद छाया सावरकर भक्तांचीही पाठ सोडत नाही. जगाला अशा लोकांबद्दल नक्कीच माहिती व्हायला हवी. खरे तर ही संस्था म्हणजे ‘सावरकर निष्ठांची मांदियाळी आहे’ असे म्हणावेसे वाटते. गिरीश दामले हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आता या संस्थेला नागपूरात ‘अभिनव भारत भवन’ नावाचे भव्य स्मारक उभारायचे आहे. यासाठी निधी गोळा करण्याचे कार्य सुरु आहे. त्यांना या कार्यात लवकरात लवकर यश मिळो, ही सदिच्छा. खरे तर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरांत सावरकरांचे स्मारक उभे राहायला हवे. कारण सूर्यप्रकाशाने जसे जीवन मिळते, तसेच सावरकरांच्या तेजाने जीवनाला अर्थ मिळतो. याच तेजातून सावरकर निष्ठांची मांदियाळी आकार घेत असते…

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.