मनसेला विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष कधी मिळणार?

आदित्य शिरोडकर यांनी पक्ष सोडून आता 15 दिवसांहून अधिक दिवस उलटले, तरी मनसेने अजूनही नवा अध्यक्ष निवडलेला नाही.

157

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे सध्या पालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांनी नाशिक, पुणे आणि ठाण्याचा दौरा करत वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली. मात्र, एकीकडे राज ठाकरे आणि अमित ठाकरे जरी आगामी निवडणुकीच्या कामाला लागलेले असले, तरी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेला नवा अध्यक्ष कधी मिळणार, असा प्रश्न आता मनविसेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असलेल्या आदित्य शिरोडकर यांनी जुलै महिन्यात मनसेची साथ सोडत मनगटावर शिवबंधन बांधले. पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला हा धक्का मानला जात आहे. मात्र आदित्य शिरोडकर यांनी पक्ष सोडून आता 15 दिवसांहून अधिक दिवस उलटले, तरी मनसेने अजूनही नवा अध्यक्ष निवडलेला नाही.

(हेही वाचाः कार्यालयांत पोहचायला ‘शिव पंख’ द्या! लोकल प्रवासावरून मनसेचा टोला)

अमित ठाकरेंच्या नावाची चर्चा पण घोषणा कधी?

आदित्य शिरोडकर यांनी पक्ष सोडल्यानंतर अमित ठाकरे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र 15 दिवस होऊनही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने मनसे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. लवकरात लवकर मनसे विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष निवडावा, अशी भावना आता मनविसेचे कार्यकर्ते खासगीत बोलू लागले आहेत. अमित ठाकरे यांच्याकडे जबाबदारी द्यायची असेल तर लवकरात लवकर द्यावी, जेणेकरुन काम करायला देखील उत्साह येईल, असे मनविसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितले.

अमित ठाकरेंकडे मोठी जबाबदारी असावी

नव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले अमित ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्याबद्दल मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड कुतूहल आहे. अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी असावी, असे मनसेच्या काही नेत्यांचे म्हणणे असून, येत्या काही दिवासांत ही निवड व्हावी, असे देखील त्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचाः मनसेला धक्का! आदित्य शिरोडकरांनी बांधले शिवबंधन!)

अमेय खोपकरांची ट्वीट करुन विनंती

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देखील ट्वीट मनविसेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत ट्वीट केले होते. विद्यार्थ्यांसमोर सध्याचा काळ मोठा कठीण आहे आणि त्यासाठीच नेतृत्वही तितकंच खंबीर हवं. राजसाहेब ठाकरे यांना मनापासून विनंती आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद आता अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात यावे. राज्यातल्या तमाम विद्यार्थ्यांच्यावतीने ही कळकळीची विनंती, असे अमेय खोपकर यांनी ट्वीट केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.