
Marathi Sahitya Sammelan : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरण आणि परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण तापले आहे. या दोन्ही प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. याकरिता राज्यातील अनेक भागांमधून मोर्चे देखील काढण्यात आले. पण आता याच मुद्द्यावरून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) बैठकीत खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. मराठवाडा साहित्य परिषदेने यासंदर्भात ठराव मांडला. पण हे राजकीय विषय असल्याने हा ठराव स्वीकरता येणार नाही, असे साहित्य महामंडळाकडून सांगण्यात आले. ज्यामुळे या मुद्द्यावरून महामंडळाच्या बैठकीत वादविवाद झाल्याचे पाहायला मिळाले. (Marathi Sahitya Sammelan)
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी 23 फेब्रुवारीला समारोप झाला आहे. त्यामुळे संमेलनाच्या पूर्वसंध्येला साहित्य महामंडळाची बैठक (Marathi Literature Corporation meeting) झाली. या बैठकीत संमेलनात जे ठराव मांडायचे आहे, त्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचवेळी मराठवाडा साहित्य परिषदेने सध्या गाजत असलेल्या मराठवाड्याच्या प्रश्नांसंबंधीचा ठराव मांडला. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू, संतोष देशमुख यांचा भरदिवसा केलेला खून, गाजत असलेला मंत्र्यांचा भ्रष्टाचार, मंत्र्यांच्या हस्तकाची खंडणीखोरी, हे मराठवाड्याला लागलेले ग्रहण आहे. या घटना हिमनगाचे केवळ टोक असून देशातही मणिपूरसारख्या ठिकाणीही हेच घडते आहे. यावर ठिकठिकाणची सरकारे केवळ बोलघेवडेपणा आणि पक्षपातीपणा करत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता ही गुंडगिरी संपवण्याची हमी देण्याची मागणी हे संमेलन करत आहे’, असे या ठरावात म्हटले आहे.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : हार्दिक पंड्या २००, तर कुलदीपचे ३०० बळी पूर्ण)
मराठवाडा साहित्य परिषदेने (Marathwada Sahitya Parishad) हे ठराव जरी मांडले तरी हे ठराव स्वीकारण्यास साहित्य महामंडळाकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपण केवळ साहित्यिक विषयांवर बोलुयात. सामाजिक-राजकीय विषयांवर नको, अशी भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यावर उत्तर देताना मराठवाडा साहित्य परिषदेने संमेलनात राजकीय-सामाजिक विषयांवरील परिसंवाद घेतले जातात. मग ठराव का नकोत? आम्ही प्रतिनिधित्त्व करत असलेल्या मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न मांडण्याची आमची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडली. त्यावर हा ठराव सौम्य शब्दांत मांडण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र मराठवाडा साहित्य परिषदेने त्यास नकार दिला. त्यामुळे आता महामंडळ हा ठराव स्वीकारणार की नाकारणार अथवा सौम्य शब्दांत मांडणार, हे आज रविवारी समारोप सोहळ्यात स्पष्ट होईल. परंतु, एकीकडे आपण दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या साहित्यिकांची परंपरा अभिमानाने मिरवतो; मात्र दुसरीकडे त्यांच्यासारखी राजकीय-सामाजिक विषयांवर कणखर भूमिका घेत नाही. हे योग्य नाही, असे मत मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी मांडले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community