ईशान्य मुंबईतून निवडून आलेले भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी विभागातील नगरसेवकांसह विधानसभा अध्यक्ष ते वॉर्ड अध्यक्षांना दिल्लीवारी घडवून केंद्र सरकारच्या मुंबई महाराष्ट्रातील विविध योजना, प्रकल्प आणि विकासकामांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्यामुळे आपण संसदेत पोहोचलो, त्यांना संसद दाखवताना पक्षाचे मुख्यालयही दाखवून पक्षाप्रती आपली असलेली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न कोटक करत आहे. केंद्राच्या योजना आणि प्रकल्पांची माहिती दिल्यामुळे नगरसेवक आता तेजतर्रार झाले असून प्रत्येक नगरसेवक आणि कार्यकर्ता आता केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.
ईशान्य मुंबईतील भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे, नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट,श्रीनिवास त्रिपाटी, समिता कांबळे, वैशाली पाटील, साक्षी दळवी, सारीका पवार, जागृती पाटील, रजनी केणी,बिंदु त्रिवेदी व सुर्यकांत गवळी आदी नगरसेवकांना खासदार मनोज कोटक यांना दिल्लीवारी घडवून आणली. दिल्लीवारीमध्ये ईशान्य मुंबईतील या नगरसेवकांनी नितीन गडकरी, डॉ. भारती पवार, कपिल पाटील, हरदीप सिंह पुरी, रावसाहेब दानवे आदी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांच्याशी संबधित खात्याची मुंबईसह राज्यात सुरु असलेल्या प्रकल्पांची तसेच योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच नवनीत राणा, गोपाळ शेट्टी आदी खासदारांच्या भेटीही त्यांनी घेतल्या. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतिभा पवार यांच्याकडून राज्याला देण्यात आलेल्या कोविड लसींच्या पुरवठ्याची माहिती जाणून घेतली. तसेच नितीन गडकरी यांच्याकडून राज्यातील रस्ते विकासकामांची माहितीही जाणून घेतली. केंद्राच्या योजना आणि प्रकल्पांची माहिती मिळाल्याने ईशान्येतील नगरसेवकांच्या ज्ञानात अधिक भर पडलेली आहे.
मनोज कोटक यांनी खासदार बनल्यानंतर मार्च २०२०मध्ये ही संकल्पना राबवून आपल्या कार्यकर्त्यांना व नगरसेवकांना दिल्लीवारी घडवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोविडमुळे ही दिल्लीवारी रद्द करावी लागली होती. परंतु मागील महिन्यात ईशान्य मुंबईतील जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष यांची दिल्लीवारी केल्यानंतर मागील सोमवारी नगरसेवकांना दिल्लीत नेले होते. त्यानंतर आता महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्लीला नेवून पक्षाचे मुख्यालय, संसदेचे कामकाज, राजघाट, तसेच इतर पर्यटन स्थळांना भेटी दिल्या जाणार आहे. या महिला आघाडीला केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या विशेष मार्गदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community