- मंजिरी मराठे
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) हे जग सोडून गेल्याला ५९ वर्ष झाली. त्यांनी म्हटलं होतं, माझे विचार तुम्हाला पन्नास वर्षांनी पटतील, तोपर्यंत थांबण्याची माझी सिद्धता आहे. तुम्हाला माझी विचारसरणी पटली तर मी प्रेषित ठरेन आणि नाही पटली तर वेडा ठरेन. पन्नास काय सावरकरांनी मांडलेल्या कित्येक विचारांना शंभरपेक्षाही जास्त वर्ष झाली आहेत आणि आत्ता कुठे त्यांचे विचार आपल्याला थोडे थोडे पटू लागले आहेत. यात दोष आपला आहे, सावरकर हे भविष्यवेत्ते होते, त्यांचे विचार समजून घेण्यात आपण कमी पडलो आहोत. सावरकर प्रेषित तर ठरले आहेतच. पण हिंदू समाज हा वेडा ठरला आहे. सुधारणा म्हणजे अल्पमत, रूढी म्हणजे बहुमत असं ते म्हणत असत. बहुमत आपल्या बाजूनं नाही हे माहीत असूनही, त्याची पर्वा न करता ते आपले विचार मांडत राहिले. सावरकरांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत, राष्ट्रासाठी दिशादर्शक आहेत, आजच्या काळाशी सुसंगत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं (Veer Savarkar) प्रत्यक्ष नाव घेतलं जात नसलं तरी आज देश चालतो आहे तो ‘सावरकरी’ विचारांवर. ज्यावेळी तत्कालीन पंतप्रधान म्हणत होते, आम्हाला सैन्यच नको; महात्मा म्हणत होते, ब्रिटिशांनी देश सोडावा पण आपलं सैन्य ठेवावं; त्यावेळी सावरकर म्हणत होते, ‘स्वातंत्र्य मिळालं आहे ते शस्त्रबळानं आणि स्वातंत्र्य रक्षणार्थ शस्त्रास्त्र सामर्थ्य हवं. स्वतंत्र भारताची तिन्ही दलं अत्याधुनिक शस्रांनी सुसज्ज हवी, आपल्याकडे अणुध्वमच काय हायड्रोजन, ऑक्सिजन बॉम्ब हवेत.’ भारतानं अणुचाचण्या तर केल्या आहेतच पण आपलं सैन्य आता अधिकाधिक शस्त्रसज्ज होऊ लागलं आहे.
ब्रिटिशांच्या विध्वंसात आपण आपले स्वातंत्र्य शोधता कामा नये, असं महात्मा सांगत असताना शत्रूची अडचण ही भारतासाठी सुवर्णसंधी आहे असं सावरकरांना (Veer Savarkar) वाटत होतं. ब्रिटिश काही जातीच्या हिंदूंची सैन्यभरती करत नव्हते. लॉर्ड लिनलिथगो यांनी घेतलेल्या भेटीत सावरकरांनी त्यांना बिन लढाऊ जमात हा भेद काढून सर्व हिंदूंना सैन्यात भरती करून घेण्यास सांगितलं. कोकणपट्टीतील कोळी, भंडारी, आग्री इत्यादी सामुद्रिक कामात निष्णात असणाऱ्या मुळच्या लढवय्या लोकांना नौदलात भरती होण्यास प्रवृत्त केलं. हवाई दलातही भरती होऊन हिंदूंचं लाखावरी सैन्य निर्माण झालं.
(हेही वाचा Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ गीताला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार)
युद्धसामग्रीची मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याकरता सुरु झालेल्या नवीन सैनिकी उद्योगांचा लाभ घेण्याचं, ते ज्ञान मिळवण्याचं सावरकरांनी आवाहन केलं. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळू लागला. प्रशाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सैनिक शिक्षण सक्तीचं करावं असाही प्रयत्न सावरकरांनी (Veer Savarkar) केला. जेलभरो आंदोलन करून ब्रिटिशांच्या तुरूंगात जाऊन बसणं हा स्वातंत्र्याचा मार्ग नसून ब्रिटिश अडचणीत आल्यामुळे सैन्यात मोठ्या प्रमाणावर भरती करत असताना शस्त्रं हातात घेण्याची ही संधी साधून सैन्यात जाणं हीच आत्ताची खरी देशसेवा आहे असं ते सांगत होते. ब्रिटिश सैन्यात भरती झाल्यास आपल्याला सैनिकी शिक्षण सहज मिळेल आणि स्वातंत्र्यासाठी उठाव करण्याची वेळ येताच बंदुकीची नळी कुठल्या दिशेला फिरवायची ते आपल्या हाती असेल असा सावरकरांचा (Veer Savarkar) अत्यंत धोरणी विचार होता. सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या प्रचारामुळे ब्रिटिश सैन्यातील हिंदूंची संख्या ६५ टक्के झाली, त्यामुळे फाळणीच्या वेळी आपला देश वाचला. १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यामुळे फाळणीनंतर मुस्लिम पलटणीही पाकिस्तानात गेल्या. जर सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला नसता आणि पाकिस्तानकडे पूर्वीप्रमाणेच ६५% मुस्लिम सैन्य राहिलं असतं तर हिंदुस्थान आणि हिंदूंचं अस्तित्व १९४७ मध्येच नष्ट झालं असतं. त्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे ते सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळेच.
मुस्लिम लीग एका व्यक्तीला चार मतांचा अधिकार मागत असताना आणि मुस्लिम धार्जिणी कॉंग्रेस त्यांच्या हो मध्ये हो मिसळत असताना सावरकरांनी ‘एक व्यक्ती एक मत’ या विचाराचा पुरस्कार केला. आज अनिर्बंध वाढणारी मुस्लिमांची संख्या पाहता एका मुस्लिम व्यक्तीला चार मतांचा अधिकार असता तर हिंदुस्थानात हिंदूंची काय अवस्था झाली असती याचा केवळ विचारही झेपणारा नाही. त्यामुळे हिंदूंचं अस्तित्व टिकून आहे ते सावरकरांच्या दूरदृष्टीमुळेच, सावरकरी विचारांमुळेच.
(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)
Join Our WhatsApp Community