-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत असून पूल बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे, पावसाळ्याच्या कालावधीत कामे खोळंबणार नाहीत, याची दक्षता बाळगावी. ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यासाठी आतापासून नियोजन करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधितांना दिले. (Mahalakshmi Bridge)
विकास नियोजन आराखड्यानुसार सुरू असलेल्या महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावरील उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावरील केबल स्टेड आधारित उड्डाणपुलांच्या कामांची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. महालक्ष्मी येथे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विकास नियोजन आराखड्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्यावतीने दोन नवीन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलांमुळे वाहतुकीचे नियमन सुरळीत होणार आहे. केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारा ‘केबल स्टेड पूल’ हा रेल्वे रूळांवरील महानगरपालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. (Mahalakshmi Bridge)
(हेही वाचा – Pune Airport वर ३.५ कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त)
महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी ८०३ मीटर तर रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी २३.०१ मीटर इतकी आहे. तसेच, उत्तरेकडे डॉ. ई. मोझेस मार्ग ते वरळीकडून धोबी घाट मार्गावरील उड्डाणपुलाची लांबी ६३९ मीटर आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामात येणाऱ्या झाडांचे संरक्षण व्हावे, यासाठी महानगरपालिकेने उड्डाणपुलाच्या संरेखनात योग्य ते बदल केले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पांची पाहणी केली. (Mahalakshmi Bridge)
केबल स्टेड पुलास आधार देण्यासाठी ७८ मीटर उंच पायलॉन (मोठा खांब) उभारावा लागणार आहे. त्यासाठी अंदाजे २०० दिवस म्हणजेच ७ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्याचबरोबर केबल स्टेड पुलाच्या दोन्ही बाजूंचे काम एकत्रितपणे करावे लागणार आहे. रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने टप्प्याटप्प्याने कायर्वाही केली जाणार आहे. केबल पुलाच्या स्पॅन बांधकामासाठी सुमारे २५० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. याचा विचार करता बांधकामासह पुलाची अनुषंगिक कामे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण व्हायला हवी. यासाठी कामांचे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे. हे करत असताना शक्य असेल तेव्हा एकाचवेळी दोन कामे एकत्रित (ओव्हरलॅपिंग) करावीत, जेणेकरून वेळेची बचत होईल. पावसाळ्यात कामे थांबणार नाहीत, अशा दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश बांगर यांनी दिले. (Mahalakshmi Bridge)
(हेही वाचा – Veer Savarkar आध्यात्मिक होते, पण…; गोपाळ सारंग काय म्हणाले ?)
पुलाच्या संरचेमुळे काही घरे तथा कंपनी बाधित होत आहेत. त्याची कार्यवाही संबंधित विभागांनी (वॉर्ड) पूर्ण करावी. जेणेकरून पुलाचे काम पूर्ण करून पुरेशा रूंदीचा पूलाच्या बाजूचा रस्ता (स्लीप रोड) वाहतुकीसाठी उपलब्ध करून देता येईल. वाहतूक वळविल्यानंतर पर्यायी रस्ता सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी, असे देखील निर्देश बांगर यांनी दिले. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. (Mahalakshmi Bridge)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community