पुण्यातील स्वारगेट बस (Swargate Bus) स्थानकावर घडलेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवले आहे. या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनीही पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
हा गुन्हा अक्षम्य, आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही – अजित पवार
या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “स्वारगेट बस (Swargate Bus) स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ही घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि सुसंस्कृत समाजाच्या तोंडाला काळीमा फासणारी आहे. या गुन्ह्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. या अक्षम्य गुन्ह्यासाठी आरोपीला फाशीशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा असू शकत नाही. तसेच, पुणे पोलीस आयुक्तांना तातडीने तपासाच्या सूचना देत, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारची तातडीची कारवाई
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खालील उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे
- पीडितेला सर्वतोपरी मदत : पीडित बहिणीला मानसिक आधार, आवश्यक मदत आणि संरक्षण देण्यासाठी महिला व बालविकास मंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना निर्देश.
- द्रुतगती न्याय : आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पाडण्याचा सरकारचा प्रयत्न.
- महिला सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना : भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणखी कडक कायदे व उपाययोजना करण्याचा निर्धार.
(हेही वाचा Pune Crime : पुणे हादरलं! स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरूणीवर बसमध्ये अत्याचार)
मुख्यमंत्र्यांकडून कठोर निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, पोलिसांना कसलीही ढिलाई न करता तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न करून लवकरात लवकर आरोपीला गजाआड करण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात संतापाची लाट
स्वारगेट बस (Swargate Bus) स्थानकात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना, सरकारने त्वरित कारवाई करत आरोपीला कठोर शिक्षा होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
Join Our WhatsApp Community