मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्यावतीने २४ विभाग कार्यालयांमध्ये क्लीन अप मार्शल (Clean-up Marshals) संस्थांची नेमणूक करून मार्शल्स नेमण्यात आले आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणांसह रुग्णालय परिसरातही स्वच्छता राखण्यासाठीही अशाच प्रकारे क्लीन अप मार्शल नेमण्यात आले असून या क्लीन अप मार्शलकडून रुग्णालय परिसरात केवळ वसुलीच चालू असल्याचे दिसून येत आहे. नायर रुग्णालयाच्या परिसरातच क्लीन अप मार्शल (Clean-up Marshals) गणवेश न घालता साध्या कपड्यांमध्ये फिरुन रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची दंडाच्या नावाखाली चिरीमिरी आपल्याच खिशात घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रकार दिसून येत आहेत.
मुंबईत स्वच्छतेसंदर्भात कारवाईसाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शल (Clean-up Marshals) यांना मागील फेब्रुवारी २०२४ मध्ये नेमण्यात आले. मागील ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये १ लाख ४० हजार ५८४ नागरिकांकडून ४ कोटी ५४ लाख ५१ हजार ४१२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. कामकाजात कसूर केल्याप्रकरणी एफ दक्षिण विभागात कार्यरत संस्थेकडून ३१ लाख ३४ हजार रुपये, आर मध्य विभागातील संस्थेकडून १६ लाख ३ हजार रुपये, तर आर दक्षिण विभागातील संस्थेकडून १२ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात यावा, असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी आढावा घेतल्यानंतर दिले आहेत. त्यामुळे या तीन संस्थांकडून सुमारे ६० लाखांचा दंड वसूल केला जाणार असून उर्वरीत तीन संस्थांवरही कारवाई करण्यात येणार असल्याने ही दंडाची रक्कम ६५ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी तैनात असलेले क्लीन अप (Clean-up Marshals) हे स्वच्छतेपेक्षा जास्तीत जास्त दंड वसूल करण्यासाठी गणवेश धारण न करता साध्या कपड्यांमध्ये फिरून थुंकणाऱ्या, तसेच कचरा टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करत असल्याचे प्रकार होत आहे. याबाबत नागरिकांकडून आरोपही केले जात असतानाच नायर रुग्णालयातील खिडकी क्रमांक ४ येथील परिसरात रांगेत उभ्या असलेल्या रुग्ण तथा रुग्णांच्या नातेवाईकांना हेरुन त्यांच्याकडू कचरा खाली टाकल्यास दंड वसूल करतात. प्रत्यक्षदर्शी रुग्णाच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पैसे भरण्याच्या रांगेत उभ्या असलेल्या क्लीन अप मार्शलने (Clean-up Marshals) दंड वसूल केला. परंतु त्यांनी १०० रुपये दिल्यानंतर पावती देण्यास नकार दिला. पावती हवी असेल तर २०० रुपये द्या असे सागून शंभर रुपये स्वत:च्या खिशात टाकून मोकळे होत होते. विशेष म्हणजे रुग्णालयाच्या आतील परिसर असतानाही एक तरी क्लीन अप मार्शल गणवेशात तिथे नसतात आणि अस्वच्छता करणाऱ्यांकडून पावतीनुसार दंड न घेता, पकडलेल्या रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकाला १०० रुपयांमध्ये मांडवली करून ते पैसे महापालिका तथा कंपनीच्या तिजोरीत जावून न देता स्वत:च्याच खिशात घालण्याचे काम करतात असे दिसून येत आहे. त्यामुळे गणवेश न घालता दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार या क्लीन अप मार्शलना आहे का आणि जर नसेल तर रुग्णालय व्यवस्थापन तसेच तेथील सुरक्षा अधिकारी त्यांना अटकाव का करत नाही, असा सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
Join Our WhatsApp Community