Veer Savarkar यांच्या ५९व्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न

गेली पंचवीस वर्षे ही स्पर्धा महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये स्वातंत्र्य वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येते.

137

25 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र मिलिटरी स्कूल येथे स्वातंत्र्य वीर सावरकर (Veer Savarkar) आत्मार्पण दिनानिमित्त कै. अशोक इनामदार स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेकरिता तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. 26 फेब्रुवारी 2026 रोजी या वर्षी महाशिवरात्री आणि सार्वजनिक सुट्टी असल्याने सदर स्पर्धा एक दिवस अगोदर घेण्यात आली. तरीही स्पर्धकांनी सदर स्पर्धेसाठी गर्दी केली.

गेली पंचवीस वर्षे ही स्पर्धा महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये स्वातंत्र्य वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येते. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध लेखन आणि दिग्दर्शक आणि वीर भाई कोतवाल चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक एकनाथजी देसले यांना निमंत्रित करण्यात आले होते. तर सामाजिक कार्यकर्ते आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक भालचंद्र गोडांबे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. समारंभाचे प्रारंभी शाळेच्या सर्व शिक्षकांनी सावरकरांचे “सागरा प्राण तळमळला” हे प्रसिद्ध गीत सादर केले. वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा उद्देश आणि हेतू स्पष्ट करतांना सांगितले की, मागील पंचवीस वर्षांपासून या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, सन 2005 पासून अधिवक्ता कै. अशोक इनामदार स्मृती चषक देऊन गौरविण्यात येत आहे. तालुक्यातील विविध शाळांमधील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून असंख्य स्पर्धकांनी बक्षिसे मिळवली आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये ज्वलंत राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासह वक्तृत्व कलेस प्रोत्साहन देणे हा असून शाळा प्रमुखांनी दरवर्षी नवनवीन स्पर्धक विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा Veer Savarkar यांच्या ५९व्या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे विविध कार्यक्रम संपन्न)

यानंतर प्रमुख पाहुणे यांचा परिचय देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, अ, ब, क गटातील स्पर्धकांची भाषणे झाली. अनेक स्पर्धकांनी स्वातंत्र्य वीर सावरकरांचा (Veer Savarkar) जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला. स्पर्धकांनी सावरकरांच्या जीवनातील अनेक घटना सांगितल्या. सर्वांनी सावरकरांच्या क्रांतिकार्याचे घटनाक्रम सादर केले. सदर स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या भाषणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उपस्थितांनी स्पर्धक विद्यार्थ्यांच्या मनोवेधक भाषणांना टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एकनाथजी देसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात ते म्हणजे की, या वक्तृत्व स्पर्धेचे स्वरूप पाहता खऱ्या अर्थाने येथे सावरकर विचारांचे पारायण होत आहे. शाळेय विद्यार्थी जीवनात सावरकर विचार रुजविणे ही आजच्या काळाची गरज आहे. आणि या स्पर्धेद्वारे हा हेतू साध्य होत आहे.

आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, सावरकर (Veer Savarkar) हा भाषण करण्याचा विषय नसून सावरकर हा जीवन जगण्याचा विषय आहे. कविता आणि क्रांती या दोन भिन्न गोष्टी सावरकरांनी एकत्र करून भारतीय समाज जीवनावर स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठीचा मंत्र दिला. भारतीय स्वातंत्र्यासाठी सावरकरांचे कष्ट अतुलनीय आहेत म्हणून सावरकर विचारांनी आपण जगले पाहिजे ती सावरकरांना खरी आदरांजली ठरेल असेही त्यांनी सांगितले.यानंतर सदर कार्यक्रमाचे विशेष अतिथी भालचंद्रजी गोडांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की  सावरकर हा विद्यार्थ्यांनी आपला आदर्श ठेवला पाहिजे. कारण सावरकर हा नुसता विचार नाहीतर जगण्याची उमेद आणि प्रेरणा देणारा शब्द आहे. सावरकरांबद्दल (Veer Savarkar) बोलताना ते पुढे म्हणाले की, सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रभक्ती आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम आहे.

यानंतर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  बक्षीसे व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेकरिता शिक्षकांनी परीक्षक म्हणून काम केले. सदर स्पर्धेसाठी स्पर्धक विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देसले यांनी केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.