देशातील पहिले ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विमानतळाचा विकास केला जात आहे. या प्रकल्पावर नोडल एजन्सी म्हणून सिडको काम करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या विमानतळावर विविध चाचण्या करण्यात येत आहेत. विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यानुसार १७ एप्रिल रोजी विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले करण्याची योजना आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवार, २७ फेब्रुवारी या दिवशी विमानतळ प्रकल्पाला भेट देत आढावा घेतला.
(हेही वाचा – महाकुंभमेळ्याची सांगता होताच PM Narendra Modi यांनी पोस्ट लिहीत का मागितली माफी?)
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा नियामक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विमानतळाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे संचालक फैज अहमद किडवई यांनी विमानतळाच्या धावपट्टी, एप्रन, टॅक्सी वे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हॅंडलिंग सिस्टीम आदी सुविधांचा आढावा घेतला.
या वेळी नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रादेशिक संचालक प्रकाश निकम, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल आदी उपस्थित होते.
या वेळी मॉक चेक-इन प्रक्रिया राबविण्यात आली. या अंतर्गत डमी बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅग जारी करण्यात आले.
Join Our WhatsApp Community