या घटनांमुळे मोदी म्हणाले- 5 ऑगस्ट ही तारीख ‘ऐतिहासिक’

128

5 ऑगस्ट ही तारीख ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. 5 ऑगस्ट 2021 रोजी भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये तब्बल 41 वर्षांनी पदक जिंकले. तर गेल्या दोन वर्षांमध्ये भारतात 5 ऑगस्ट रोजीच दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 5 ऑगस्ट 2019 ला जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटवण्यात आले. तर 2020 रोजी याच दिवशी अनेक वर्षांपासून चर्चेत आणि प्रतिक्षेत असलेल्या अयोध्येतील राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा पार पडला. त्यामुळे 5 ऑगस्टचे ऐतिहासिक महत्त्व सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे.

हॉकी संघाने रचला इतिहास

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये मोलाची कामगिरी करत तब्बल 4 दशकांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देत इतिहास रचला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण संघाचे प्रत्यक्ष फोन करुन अभिनंदन तर केलेच, पण ट्वीट करतही त्यांनी हॉकी संघाचे कौतुक केले आहे. भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंनी पदक जिंकत ऑलिम्पिकमध्ये हॉकीला पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली आहे, असे ट्वीट करत मोदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

एक भारत, श्रेष्ठ भारत

त्याचबरोबर 5 ऑगस्टचे महत्त्व सांगताना मोदींनी जम्मू-काश्मीरमधील 370 कलमाच्या निर्मूलनाचाही उल्लेख केला आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरसाठी जाचक असणारे 370 कलम नष्ट करुन, तेथील प्रत्येक नागरिकाला एक भारतीय म्हणून त्यांचे असलेले सर्व अधिकार देण्यात आले. यामुळे एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना देशात अधिक बळकट झाली, असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

राम मंदिर भूमीपूजनाच्या आठवणींना उजाळा

यासोबतच नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये झालेल्या अयोध्या राम मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या स्मृतीही ताज्या केल्या आहेत. 5 ऑगस्ट ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी कोट्यावधी भारतीयांची प्रतीक्षा संपली. याच दिवशी अयोध्येत भव्य अशा राम मंदिर निर्माणासाठी पहिले पाऊल उचलण्यात आले, असे मोदी यांनी म्हटले आहे.

मोदींनी फोन करुन केले कौतुक

भारतीय हॉकी संघाने इतिहास 40 वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास रचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचे फोनवरुन अभिनंदन केले. संपूर्म भारताला तुमचा अभिमान आहे. तुम्ही देशाची मान ताठ केली आहे, तुमची मेहनत आणि कठोर परिश्रमांचे हे फळ असल्याचे सांगत मोदींनी संघाचे कौतुक केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.