मुंबई महापालिकेच्या मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहाय्यक(प्रमुख लेखापाल खाते) या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा आता प्रशासनाने पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा ६,७ आणि ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु आता या परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २२, २३ आणि २४ ऑक्टोबर २०२१ रोजी या परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रजा घेणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना, पुन्हा दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवाय दोन महिन्यांनी या परीक्षा होणार की त्या रद्द होणार, हा प्रश्न प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात घोळत आहे.
बैठकीत घेतला निर्णय
मुंबई महापालिकेतील मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहाय्यक या पदांसाठी खात्यांतर्गत परीक्षा ६ ते ८ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने महापालिका आयुक्तांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले आहे. त्याअनुषंगाने ३ ऑगस्ट २०२१ रोजी अतिरिक्त आयुक्त(शहर) संजीव कुमार यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या परीक्षा आता २२ ते २४ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्याचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.
त्यामुळे जे परीक्षार्थी रजेवर, प्रतिनियुक्तीवर गेले असतील किंवा ज्यांची अन्य विभाग कार्यालयांमध्ये बदली वा नेमणूक झाली असेल, अशा सर्व संबंधित परीक्षार्थींना सर्व खातेप्रमुख तथा सहाय्यक आयुक्तांनी या परिपत्रकाची माहिती करुन देण्याच्याही सूचना सामान्य प्रशासन विभागाने केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community