Meta Layoffs : मेटाने अंतर्गत माहिती बाहेर फोडल्याबद्दल २० कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी

Meta Layoffs : आणखी काही कर्मचाऱ्यांवर अशीच कारवाई होणार आहे.

47
Meta Layoffs : मेटाने अंतर्गत माहिती बाहेर फोडल्याबद्दल २० कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी
  • ऋजुता लुकतुके

मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीने २० कर्मचाऱ्यांना अंतर्गत माहिती बाहेर फोडल्याबद्दल काढून टाकलं आहे. व्हर्ज या मासिकाने याविषयीची बातमी दिली असून, कंपनीतील सूत्रांच्या हवाल्याने असं बातमीत म्हटलं आहे. त्यानंतर मेटा कंपनीचे प्रवक्ते डेव्ह आरनल्ड यांनी व्हर्ज कंपनीला लेखी पत्रकही दिलं आहे. ‘कंपनीत शामील करून घेताना आम्ही कर्मचाऱ्यांना अंतर्गत माहितीविषयी गोपनीयता बाळगण्याविषयी सांगतो. वेळोवेळी त्यांना याची आठवणही करून देतो. पण, अलीकडेच एका प्रसंगानंतर कंपनीने अंतर्गत तपास केला असता किमान २० कर्मचारी या नियमाचा भंग करत असल्याचं आढळून आलं. आणखीही काही कर्मचारी यात गुंतलेले असू शकतात आणि त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. आम्ही ही गोष्ट गांभीर्याने घेतो असंच आम्हाला कर्मचारी आणि बाहेरच्या घटकांना सांगायचं आहे,’ असं आरनल्ड यांनी या पत्रकात म्हटलं आहे. (Meta Layoffs)

(हेही वाचा – Raigad fishing boat fire : अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला लागली आग ; बोटीत 18 ते 20 खलाशी)

गेल्या काही महिन्यात मेटा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठीचे काही नियम बदलले आहेत. इतकंच नाही तर ग्राहकांसाठीही धोरणं बदलण्यात आली आहेत. हे सगळे बदल अंतर्गत माहिती गुप्त राहावी यासाठीच करण्यात आले आहेत. अमेरिकेत ट्रम्प प्रशासन सुरू झाल्यानंतर हे बदल झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. कारण, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात फेसबुकवर ट्रम्प यांच्या विरोधात राबवल्या गेलेल्या मोहिमेमुळे कंपनी सध्या अडचणीत आली आहे. ट्रम्प यांनी कंपनीवर दावाही लावला आहे. अशावेळी हा दावा कोर्टाच्या बाहेर मिटवण्यासाठी कंपनीने २५ दशलक्ष अमेरिकन डॉलरही देऊ केले आहेत. कॅपिटॉल इमारतीवर २०२१ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक खातं काही काळासाठी बंद केलं होतं. त्यानंतर ट्रम्प कंपनीवर संतापले होते. (Meta Layoffs)

(हेही वाचा – Virat Kohli सचिनच्या १०० शतकांचा विक्रम मोडेल ; वसिम जाफर यांचं विधान)

अलीकडेच कंपनीच्या एका बैठकीत झुकरबर्गने अंतर्गत संभाषणं आणि निर्णय बाहेर फोडले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि कर्मचाऱ्यांना इशाराही दिला होता. ही बातमीही पुढे फुटली. ‘मी मोकळेपणाने तुम्हाला काहीतरी सांगायला जातो आणि ते सगळं बाहेर फुटतं,’ असं वैतागलेल्या झुकरबर्गने म्हटलं होतं. हा कारवाईचा भाग सोडला तर इतरही कारणांनी मेटा कंपनीत नोकर कपात सुरू आहे. चांगली कामगिरी नसल्याचा शेरा मारून मेटाने या वर्षी ३,००० लोकांना काढून टाकण्याची तयारी चालवली आहे. कंपनीच्या ५ टक्के कर्मचाऱ्यांना यंदा नारळ देण्यात येणार आहे. कंपनी आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर लक्ष केंद्रीत करणार आहे. आणि तिथली गुंतवणूक दुपटीने वाढवण्यात येणार आहे. (Meta Layoffs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.