रस्त्यावर रात्रीच्या सुमारास उपाशीपोटी फिरणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला जेवणाचे आमिष दाखवून, तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जुहू येथे बुधवारी रात्री उघडकीस आली. रुग्णालयात दाखल झालेल्या या पीडित तरुणीवर बलात्कार झाल्याचे रुग्णालयाकडून कळताच, जुहू पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल करुन एका रिक्षाचालकाला काही तासांतच अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईत रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन एकट्या-दुकट्या जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रिक्षात बसवले आणि…
पीडित तरुणी ही विलेपार्ले पश्चिम येथील फुटपाथवर राहणारी बेगर्स असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ही पीडित तरुणी उपाशीपोटी जुहू पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरत असताना, एका रिक्षाचालकाचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने तिच्याकडे विचारपूस केली असता, तिने भूक लागली असल्याचे सांगितले. रिक्षाचालकाने तिला रिक्षात बसवले. ‘चल तुला जेवायला देतो’, असे सांगून तिला रिक्षातून फिरवून लालमिठ्ठी मैदान याठिकाणी तो तिला घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यावर तो बळजबरी करू लागला. पीडितेने विरोध करताच त्याने तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला आणि याची वाच्यता कुठे केलीस तर ठार मारेन, अशी धमकीही दिली. त्यानंतर पीडितेला त्याच अवस्थेत सोडून रिक्षाचालक तेथून पळून गेला.
(हेही वाचाः कॉरंटाईनच्या भीतीने बहिणींनी केला आत्महत्येचा प्रयत्न)
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
या पीडित तरुणीने स्वतःला सावरत पहाटेच्या सुमारास कूपर रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी तिला त्या अवस्थेत बघून ताबडतोब तिला उपचारासाठी दाखल केले असता, तिने तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगाची माहिती डॉक्टरांना दिली. कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी ताबडतोब जुहू पोलिस ठाण्याला याबाबत कळवले. जुहू पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पीडित तरुणीचा जबाब नोंदवून अनोळखी रिक्षाचालकाविरुद्ध बलात्कार, मारहाण करणे, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
अवघ्या काही तासांत आरोपी गजाआड
त्यानंतर आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला. विलेपार्ले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरुन अवघ्या काही तासांत रिक्षाचालक मोहम्मद आरिफ गुलाम सरवर(३२) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला गुरुवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित तरुणीवर उपचार करुन तिला महिला सुधारगृह येथे पाठवण्यात आले आहे.
(हेही वाचाः कराची से रॉकेट मारुंगा… परमबीर सिंग खंडणी प्रकरणात आता अंडरवर्ल्डची एंट्री)
Join Our WhatsApp Community