-
प्रतिनिधी
सोमवारपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रचंड गाजण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, महिला अत्याचार, मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, लाडकी बहीण योजनेतील छाननी आणि मंत्री धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प १० मार्च रोजी सादर होणार आहे. मात्र, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद, मंत्र्यांसाठी खासगी सचिव व विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे संकेत दिले आहेत. (Budget Session)
(हेही वाचा – BMC : माहुलमधील प्रकल्प बाधितांची घरे महापालिकेच्या तृत्तीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांना विकत घेता येणार)
कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात?
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आमदार अपात्रतेची टांगती तलवार आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्याप्रमाणेच कोकाटे यांची आमदारकी रद्द करून त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांकडून केली जाण्याची शक्यता आहे. (Budget Session)
स्वारगेट अत्याचार प्रकरणावरून गृहमंत्र्यांना घेरण्याची तयारी
पुण्यातील एसटी स्थानकात एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकार अडचणीत आले आहे. विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
महिला सुरक्षेसाठी महाविकास आघाडी सरकारने शक्ती विधेयक मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवले होते. मात्र, केंद्राने त्यातील तरतुदी फेटाळून लावत विधेयक मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर प्रहार होण्याची शक्यता आहे. (Budget Session)
(हेही वाचा – अभिनेते Sharad Ponkshe यांना ‘अभिनय कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान)
‘लाडकी बहीण’ योजनेतील छाननीचा मुद्दा अधिवेशनात गाजणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करून महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा लाभ २,१०० रुपये करण्याचे आश्वासनही दिले. मात्र, निवडणुकीनंतर सरकारने लाभार्थी महिलांची छाननी सुरू केली असून, आतापर्यंत ५ लाखाहून अधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या निर्णयावरून विरोधक सरकारवर टीका करत असून, अधिवेशनात हा मुद्दा आक्रमकपणे मांडला जाणार आहे. (Budget Session)
सरकारला विरोधकांचा कोंडीत पकडण्याचा इशारा
महाविकास आघाडी सरकार विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांपासून ते योजनांमधील बदलांपर्यंत अनेक विषय अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार टोकाचे संघर्ष पाहायला मिळतील. (Budget Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community