विनाअनुदानित शिक्षकांचा राज्यभर घंटानाद

127

राज्यातील सर्व अंशतः अनुदानित, अघोषित, त्रुटी अपात्र शाळांना 100 टक्के प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, या मागणीसाठी विनाअनुदानित शिक्षक 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी राज्यभरात शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य(कायम) विनाअनुदानित व अनुदानित शाळा कृती समितीने दिली आहे.

शाळांना एक रुपयाचेही अनुदान नाही

याबाबत अधिक माहिती देताना कोकण विभागाचे अध्यक्ष यादव शेळके म्हणाले, आम्हा विनाअनुदानित शिक्षकांवर गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे. सर्वच विनाअनुदानित शाळा आज १०० टक्के प्रचलित नियमांनुसार अनुदानास पात्र आहेत. मात्र काहींना 20 टक्के तर काहींना 40 टक्के अनुदान देऊन शासनाने आमची बोळवण केली आहे. बऱ्याच शाळांना अजून एक रुपया देखील अनुदान नाही. जवळपास वीस वर्षे विनाअनुदानित शाळेत सेवा करुन काही शिक्षक बिनपगारी निवृत्त झाले आहेत, तर काही येत्या एक-दोन वर्षात होतील. अनुदानित शिक्षकांप्रमाणेच विनाअनुदानित शिक्षकांना वेतन मिळणे हा अधिकार आहे. मात्र हेतुपुरस्सर आमच्या बाबतीत झोपेचे सोंग घेत असल्याने, शासनाला झोपेतून जागे करण्यासाठीच संघटनेच्या वतीने ढोलबजाव व घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, असे कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष संजय डावरे यांनी स्पष्ट केले.

तर धरणे आंदोलन करावे लागेल

नुकत्याच झालेल्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महविकास आघाडीच्या उमेदवारांना शिक्षकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते. तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आमचा प्रश्न सोडवण्याचे पालकत्व स्वीकारले होते. त्यामुळेच संघटनेचे उमेदवार खंडेराव जगदाळे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार घेतली होती आणि काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जर 15 ऑगस्ट 2021 पूर्वी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर 15 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व शिक्षक आमदार यांच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असून, यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांनी उपस्थित रहावे, असे आवाहन धनाजी साळुंखे, अनिल पाटील, गुलाब पाल, सुरेखा इंगवले, उषा सिंग यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.