Veer Savarkar जन्मस्थळी भगूर येथे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापन दिन साजरा

या कार्यक्रमात महिला दिन सप्ताह प्रारंभ निमित्त संस्थेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा मंजिरी मराठे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे ऋजुता सावंत आणि किमया कोल्हे यांना अनुक्रमे डोंबिवली शहर महिला आघाडी प्रमुख आणि कार्याध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आले.

92

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आत्मार्पणदिन सप्ताह समाप्ती याचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे सावरकरांचे जन्मस्थळ भगूर येथे निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शेकडो सावरकरप्रेमी यात सहभागी झाले होते. सर्वप्रथम भगूर येथील स्मारक सर्व सदस्यांना दाखवण्यात आले. तत्पूर्वी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व मान्यवरांचे भाषण झाले.

संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थानी होत आहे, याहून मोठे भाग्य दुसरे नाही असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कानकोपऱ्यातून सर्व सदस्यांना एकत्र घेऊन भगूर येथील सावरकर स्मारकात असे कार्यक्रम संस्थेतर्फे घेत आहोत जेणे करून या जन्मस्थळाची माहिती सर्वलोकांपर्यंत पोहोचेल. सर्वच भागातून सावरकरप्रेमीनी या पवित्र स्थळी भेट देण्याचे आवाहन देखील या प्रसंगी कुलकर्णी यांनी केले. स्वदेशी स्वातंत्र्यास्तव ज्या थोर पुरुषांनी स्वतःचे जीवन कापराप्रमाणे जाळून घेतले, त्या महापुरुषांपैकी एक हिंदुसंघटक स्वा. विनायक दामोदर सावरकर! कर्पूरगौर महापुरुष!! जगाच्या इतिहासात दोन महापुरुष असे की ज्यांनी जड वस्तूमध्ये चेतना निर्माण केली. एक, संत ज्ञानेश्वर ज्यांनी भिंत चालवली. भिंतीचे वाहन केले आणि दुसरे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी नी भिंतीचा कागद करून त्यावर काव्य निर्मिती केली…अशा प्रकारे सावरकरांचे  (Veer Savarkar) स्मरण करून त्यांना संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ. सौ. शुभा साठे यांनी सावरकरांना अभिवादन केले.

savarkar 8

हिंदूंचा पैसे हिंदूंच्याच खिशात जावा यासाठी हिंदू ते हिंदूपर्यंत व्यवसाय पोहोचावा, याकरता ओम प्रमाणपत्र असलेल्या व्यापाऱ्याकडून वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी उपस्थितांना केले.

(हेही वाचा Veer Savarkar यांच्या ५९व्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न)

लेखक अक्षय जोग यांनी स्मारक पूर्ण व्यवस्थित बघून त्याबद्दलच्या प्रत्येक जागेबद्दलची माहिती करून घ्यावी असे उपस्थिताना सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी कुठलीही संस्था जशी मोठी होत जाते तशी तिच्या समोरची आव्हाने आणि लोकांकडून असणाऱ्या अपेक्षा वाढत जातात. त्या पूर्ण कशा करता येईल याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

विश्व हिंदू परिषदचे अखिल भारतीय कार्यकारिणी ज्येष्ठ सदस्य एकनाथ शेटे यांनी भगूर येथील सावरकर स्मारकाबद्दलच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमात महिला दिन सप्ताह प्रारंभ निमित्त संस्थेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा मंजिरी मराठे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे ऋजुता सावंत आणि किमया कोल्हे यांना अनुक्रमे डोंबिवली शहर महिला आघाडी प्रमुख आणि कार्याध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आले.

भगूर स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकरांना (Veer Savarkar) अभिवादन करण्यासाठी संस्थेच्या सदस्यांनी निरनिराळ्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यात सुरुवातीला विदुला कुलकर्णी यांनी सावरकर पोवाडा सादर करून सुरुवात केली. त्यानंतर अपूर्वा बापट यांनी सावरकरांनी लिहिलेल्या ‘कोकरू’ कवितेचे निरूपण केले, तर ऋचा गोडबोले हिने सावरकर गीत सादर केले. गंधार कुलकर्णी याने ‘विनवणी’ हे स्वरचित काव्य वाचन केले. यात लहान चिमुकल्यानी सुद्धा सहभाग घेत 6 वर्षांच्या सानवी कुलकर्णी हिने अफझल खानाचा वध यावर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला, तर गार्गी वाटवे हिने वीर सावरकरांवर (Veer Savarkar) रचलेले सागरापरी अथांग जीवन हे गीत सादर केले. तर श्रुतिका करंजकर हिने सावरकरांवर आपले विचार व्यक्त केले.

सावरकर साहित्य वाचन कट्टा प्रमुख रिटायर्ड मेजर अजित कुलकर्णी यांनी पुणे ते भगूर असा प्रवास सायकलवर करून सावरकरांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन केले. भगूर शहरातून संस्थेच्या वतीने शेकडो सावरकर प्रेमींच्या उपस्थितीत भगूर गावातून पदयात्रा काढून वीर सावरकरांना (Veer Savarkar) अभिवादन करण्यात आले. पदयात्रेत तिन्ही सावरकर बंधूंचे ज्या शाळेत शिक्षण झाले ती शाळा तसेच खंडोबा मंदिरात असलेल्या स्वातंत्र्यलक्ष्मी मूर्तीचे दर्शन घेऊन दोन्ही ठिकाणी सावरकरांची प्रतिमा भेट देण्यात आली.

भगूर गावात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) मूर्तीसमोर सामूहिक आरती करण्यात आली. तसेच भगूर बसस्थानकात स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. संस्थेच्या वर्धापन दिनाची सांगता नागपूर शहरतर्फे आयोजित ‘सागरा प्राण तळमळला’ या अभिवाचनाच्या शुभारंभाने करण्यात आला.

(हेही वाचा Veer Savarkar : “देश त्यांची तपस्या, त्याग आणि धाडस विसरू शकत नाही…” ; स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून अभिवादन)

सलग दोन दिवस सुरु असलेल्या या सोहळ्यात दुसऱ्या दिवशी 2 मार्चला नाशिक येथील सावरकर स्मारकास भेट देऊन सावरकरांबरोबर कार्य केलेल्या क्रांतिकारकांचा सन्मान करण्यात आला. अभिनव भारताचे शपथबद्ध कार्यकर्ते तथा सावरकरांचे सहकारी व्यायामाचार्य महाबळगुरुजी यांचे नातू श्री. व सौ. रघुनाथ प्रभाकर तसेच अभिनव भारताचे शपथबद्ध कार्यकर्ते तथा सावरकरांचे सहकारी धर्मभूषण दामूअण्णा चंद्रात्रे यांचे नातू गजानन चंद्रात्रे, दाजीकाका यांची पुतणी शरयू कुलकर्णी, दातार बंधू यांचे नातू मिलिंद दातार यांचा सन्मान करण्यात आला.

‘सावरकर’ या विषयावर भविष्यात वक्ते तयार व्हावे या उद्देशाने संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ. शुभा साठे यांचे वक्ता प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सावरकरांच्या आयुष्यातील निरनिराळे पर्व उपस्थितांसमोर सांगून संपूर्ण सावरकर (Veer Savarkar) मांडण्याचा प्रयत्न केला. या सत्रामध्ये अनुराधा मुनशी, विदुला कुलकर्णी, ऋजुता सावंत, किमया कोल्हे, अजित कुलकर्णी, गंधार कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. यावेळी 5 वर्षांच्या रेवा शेट्टीगार हिने मनाचे श्लोक म्हणून दाखवले. संस्थेच्या डोंबिवली शाखेने सावरकरांच्या मराठी भाषाशुद्धीचा विचार मांडणाऱ्या ‘प्रतिशब्द शोधताना’ या शृंखलेचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ ने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिगंधा आठल्ये यांनी केले, तर आभार प्रदर्शन सागर बर्वे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक शहरातून संस्थेचे नितीन जोशी, शिरीष पाठक, कमलेश नंदुर्डीकर, प्रकाश आवारे यांनी परिश्रम घेतले. तर भगूर येथील कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मनोज कुवर आणि भूषण कापसे यांनी केले. तसेच मंगेश राजवाडे, दिवाकर कुलकर्णी, अनुराधा मुनशी, कृष्णा वैद्य, विक्रम दिवाण, सौरभ दुराफे व इतर पदाधिकाऱ्यांचे या संपूर्ण नियोजनात सहकार्य लाभले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.