उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कौशंबी (Kaushambi) येथे दि. ६ मार्च रोजी पहाटे बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या (Babbar Khalsa) दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश एसटीएफ आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई कुख्यात दहशतवादी लाजर मसीह याला अटक केली आहे.
दहशतवादी लाजर मसीह हा बीकेआयच्या जर्मन-आधारित मॉड्यूलचा प्रमुख स्वर्ण सिंग (Swarna Singh) उर्फ जीवन फौजीसाठी काम करत होता. तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या (ISI) थेट संपर्कात होता. मसीह याच्याकडून 3 जिवंत हँडग्रेनेड, दोन डेटोनेटर्स, १३ काडतुसे, विदेशी पिस्तूल आणि स्फोटक पदार्थाची पावडर जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडे गाझियाबादचा पत्ता असलेले आधार कार्ड आणि एक मोबाईल फोनही (सिम कार्डशिवाय) सापडला आहे.लाजर मसीह हा पंजाबमधील अमृतसरमधील (Amritsar) रामदास भागातील कुर्लियान गावचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते. दहशतवादी लाजर मसीह हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या संपर्कात होता. तो दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायालयीन कोठडीतून पळून गेला होता.
यापूर्वी, ३ मार्च रोजी हरियाणातील फरीदाबाद येथील बान्स रोड पाली येथून अब्दुल रहमान नामक जिहादी दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया (Islamic State in Iraq and Syria) या दहशतवादी संघटनेने अब्दुल रहमानला (Abdul Rehman) अयोध्या राम मंदिरावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण दिले होते. आयएसआयएसची शाखा असलेल्या इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांताने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती तपासात पुढए आली आहे. अब्दुल गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आयएसआयएसच्या संपर्कात होता.
एका सोशल मीडिया ग्रुपमध्ये एका विशिष्ट धर्माला दुखावणारे व्हिडिओ पोस्ट केले गेले होते. वेगवेगळ्या व्यक्तींकडून काही रेकॉर्ड केलेले व्हिडिओ संदेशही ग्रुपमधील लोकांना पाठवण्यात आले होते. या संदेशांमध्ये अब्दुल आणि त्याच्यासारख्या इतर तरुणांना सांगण्यात आले होते की, अयोध्येत तुमच्यावर अत्याचार झाले आहेत आणि आता तुम्हाला त्याचा बदला घ्यावा लागेल. त्याचप्रमाणे, ते हल्ल्यासाठी तयार करत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community