कोविड रुग्णांवर उपचार यंत्रणा राबवण्याठी एका बाजूला एमएमआरडीए, सिडको यांच्याकडून जंबो कोविड सेंटरची उभारणी करुन दिली जात असतानाच, दुसरीकडे कांदिवली येथील ईएसआयएस रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या खर्चाने आयसीयू खाटांची व्यवस्था केली जात आहे. यासाठी तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
कोविड रुग्णांसाठी ही व्यवस्था केली जात असली तरी हे रुग्णालय सरकारचे असून, यावर राज्य सरकारने खर्च करणे अपेक्षित होते. असे असताना यासाठी महापालिकेला आपल्या तिजोरीतून पैसा खर्च करावा लागत आहे. कोविडचा आजार गेल्यानंतरही उभारलेल्या व्यवस्थेचा लाभ या सरकारी रुग्णालयालाच होणार असून, याऊलट जंबो कोविड सेंटरच्या माध्यमातून सरकारच्यावतीने केवळ तात्पुरती सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.
(हेही वाचाः महापालिकेने किती खरेदी केले लिक्विड सिलिंडर? वाचा…)
सरकारी रुग्णालयात महापालिकेचा खर्च
कोविडची लाट ओसरल्यानंतर या आयसीयू कक्षाचा वापर या ईएसआयएस रुग्णालयाला होणार असून, सरकारच्या निधीतून याचा खर्च करण्याऐवजी महापालिकेचा निधी खर्च केला जात आहे. त्यामुळे मुंबईतील कोविड नियंत्रणात आणल्याचे महापालिकेचे श्रेय सरकार स्वत:कडे घेत असताना, त्यांना या उपाययोजनांसाठी होणाऱ्या सरकारी वास्तूतही आपल्या तिजोरीतून पैसा खर्च करता येत नाही.
दोन महिन्यांमध्ये कोविड वॉर्ड बंद
कांदिवली येथील ईएसआयएस रुग्णालयात महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मंजुरीने जून २०२० रोजी कोविड वॉर्ड सुरू करण्यात आला होता. परंतु कोविड-१९च्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने हा कोविड वॉर्ड २०२० पासून बंद करण्यात आला.
(हेही वाचाः काळ्या यादीतील कंत्राटदारावरील बंदी उठली! जे.कुमारचा पुन्हा महापालिकेत दमदार प्रवेश!)
आयसीयू कक्षाची उभारणी
मात्र, आता कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्ण संख्येत वाढ झाल्याने तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २३ एप्रिल २०२१ रोजी या रुग्णालयात कोविड रुग्णांना सेवा देण्यासाठी ६३ आयसीयू कक्षांची उभारणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे प्रशासनाने निविदा मागवल्या असून, यासाठी अथर्व हेल्थटेक इंडिया ही कंपनी पात्र ठरली आहे.
तब्बल साडेसात कोटी रुपये होणार खर्च
यामध्ये ऑक्सिजन, व्हॅक्युम व वैद्यकीय हवा पुरवण्यासाठी कॉपर पाईपलाईन टाकणे, आऊटलेट्स बसवणे, ड्युरा सिलिंडर करता मॅनिफोल्ड बसवणे, एल.एम.ओ अँक मॅनिफोल्ड रुमला जोडणे, यावरील कामाचा देखभाल व सर्वंकष दुरुस्ती आदी कामांसाठी ७ कोटी ६८ लाख ७२ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः नगरसेवकांना पडला प्रश्न, कुणासमोर फोडायचे डोकं?)
Join Our WhatsApp Community