जनतेचा दबाव आणि भारतीय जनता पार्टीचे आंदोलन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांनी नियम आणि अटींचा गुंता करुन सोपा प्रश्न अवघड करुन ठेवला आहे आणि प्रत्यक्षात सामांन्यांना सहजपणे लोकल प्रवास करता येणार नाही, अशी व्यवस्था करुन ठेवल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली.
काय म्हणाले केशव उपाध्ये?
सामान्य मुंबईकराला दररोज कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि परतण्यासाठी प्रचंड पैसे आणि वेळ खर्च करावे लागत असल्याने, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. भारतीय जनता पार्टीने त्यासाठी आंदोलनही केले. प्रचंड दबाव आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टपासून प्रवासाची परवानगी दिली. पण ती देतानाही त्यांनी सामान्यांना सहजपणे प्रवास करता येणार नाही आणि सगळ्या गोंधळाचे खापर रेल्वे विभागावर फुटेल, अशी व्यवस्था करुन ठेवली आहे. रेल्वेकडून लोकल सेवा आधीपासून चालू आहे आणि कोरोनाच्या नियंत्रणाचे सर्व अधिकार आणि जबाबदारी राज्य सरकारची आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी सामान्यांच्या परवानगीसाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हवा होता. त्यांनी अहंकारापोटी सामान्य मुंबईकरांशी असा खेळ करायला नको होता, असे केशव उपाध्ये म्हणाले.
(हेही वाचाः 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरू, पण…)
जनतेसमोर घातले कोडे
सामांन्यांना लोकल रेल्वेने प्रवास करायचा असेल तर राज्य सरकारच्या ॲपवर नोंदणी करायला हवी, अशी अट मुख्यमंत्र्यांनी घातली आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारने तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपवर बहुतेक मुंबईकरांनी नोंदणी केली आहे व त्यावर लसीकरण झाले की नाही याची स्पष्ट नोंद आहे. ही तयार सुविधा वापरुन सामांन्यांची सोय करायच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ॲप वापरा नाहीतर महापालिकेकडून पास घ्या असे कोडे घातले आहे. सोपा प्रश्न अवघड करण्याचा हा प्रकार असल्याचे केशव उपाध्ये यावेळी म्हणाले.
दोन डोसच्या अटींची पूर्तता कशी होणार?
दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देताना प्रवाशांच्या लसीकरणाबबातची तपासणी करण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी व अधिकार राज्य सरकारकडे आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी सामान्यांच्या लोकल प्रवासात दोन डोसच्या अटींची पूर्तता कशी होणार, याची व्यवस्था निश्चित केलेली नाही. तसेच याबाबत रेल्वेशी विचारविनिमय केला नाही, यामुळे गोंधळ उडून सामांन्यांना त्रास होईल आणि हा प्रकार रेल्वे स्थानकावर झाल्यामुळे त्याचे खापर मात्र रेल्वेवर फोडण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे.
(हेही वाचाः बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री असतानाही राज्यात हिंदू धोक्यात! राणेंची जळजळीत टीका)
सामान्य मुंबईकरांना सातत्याने लोकल प्रवासाला परवानगी नाकारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी देतानाही अहंकार दाखवून दिला आहे. पण त्यांनी अहंकार बाजूला ठेऊन सामान्य लोकांच्या हिताला महत्त्व द्यावे आणि त्यांचा लोकल प्रवास सहजपणे होईल यासाठी राज्य सरकारची यंत्रणा निर्माण करावी. तसेच रेल्वेशी समन्वय साधावा, असे आवाहन केशव उपाध्ये यांनी केले.
Join Our WhatsApp Community