FIFA World Cup 2030 : फिफा विश्वचषकात ६४ संघ खेळवण्याचा फिफाचा विचार

FIFA World Cup 2030 : २०३० च्या विश्वचषकात ६४ फुटबॉल संघ दिसू शकतात.

63
FIFA World Cup 2030 : फिफा विश्वचषकात ६४ संघ खेळवण्याचा फिफाचा विचार
  • ऋजुता लुकतुके

चाहत्यांचा पाठिंबा हा निकष असेल तर जगभरातील सगळ्यात लोकप्रिय खेळ हा फुटबॉलच आहे आणि आता फिफा फुटबॉल विश्वचषक आणखी मोठा करण्याचा फिफाचा विचार आहे. मुख्य स्पर्धेत २०३० पासून ६४ संघ खेळताना दिसू शकतात. २०३० साली फिफा विश्वचषक स्पर्धेचं शतक पूर्ण होत आहे. त्यामुळे शतक महोत्सवी स्पर्धेच्या निमित्ताने हा विस्तार करण्याचा विचार आहे. फिफाच्या मंडळात या आठवड्यात तसा प्रस्ताव सादरही झाला आहे. (FIFA World Cup 2030)

फिफा संघटनेला विश्वचषक स्पर्धेतून खूप मोठा फायदा होतो. अगदी अब्जावधी डॉलरची कमाई या स्पर्धेतून होत असते. पण, त्यामुळेच स्पर्धेचं आयोजन आणि त्याचं नियामन यावरून सध्या सदस्य देशांमध्ये वादही आहेत. महत्त्वाचं म्हणजे आयोजनाचे हक्क देण्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप वारंवार झाला आहे. सध्याचे फिफा अध्यक्ष गिनी इन्फॅन्टिनो यांनी २०२६ च्या विश्वचषकात संघांची संख्या आधीच्या ३२ वरून ४८ वर आणली आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा इथं संयुक्तपणे हा विश्वचषक होणार आहे. (FIFA World Cup 2030)

(हेही वाचा – Mahakumbh मुळे रोजगार, आर्थिक उत्पन्न किती वाढलं ? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी दिली आकडेवारी)

त्याचवेळी आता २०३० पर्यंत ही संख्या ६४ वर नेण्याचा प्रस्ताव सदस्य देश उरुग्वेनं ठेवल्याचं समजतंय. फिफाने प्रस्ताव स्वीकारला असून पुढील बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे. यापूर्वी फिफा विश्वचषक दर दोन वर्षांनी घेण्याचाही प्रयत्न फिफाने केला होता. विश्वचषकात सध्या ३२ संघ खेळतात, तेव्हा स्पर्धा १ महिना चालते आणि खेळाडूंच्या प्रवासाची आखणी करणं जिकिरीचं होऊन बसतं. अशावेळी जर स्पर्धा ६४ देशांची झाली तर तिचा व्याप वाढेल आणि ही एक मोठी अडचण असणार आहे. २०२६ च्या विश्वचषकात ४८ संघ आहेत तर सामन्यांची संख्या आताच १०४ वर गेली आहे. (FIFA World Cup 2030)

याशिवाय फिफा विश्वचषक आणखी लोकप्रिय करण्यासाठी फिफाने इतरही उपाय सुरू केले आहेत. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मध्यंतराला विशेष कार्यक्रम सादर करण्यासाठी फिफाने ब्रिटिश बँड कोल्डप्लेशी करार केला आहे. अमेरिकेतील विश्वचषकात न्यूजर्सी इथं पहिली कोल्डप्ले कन्सर्ट होणार आहे. तर अमेरिकेत होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हजेरी लावतील अशी दाट शक्यता आहे. ड्रॉच्या वेळी ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प हजर होती. आणि अलीकडेच एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी इन्फॅन्टिनो यांचा उल्लेख ‘किंग ऑफ सॉकर,’ असा केला होता. थोडक्यात, येत्या काळात फिफा विश्वचषकाचा विस्तार, लोकप्रियता आणि आवाका वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न फिफाकडून होणार आहेत. (FIFA World Cup 2030)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.