-
ऋजुता लुकतुके
डेव्हिस चषक या टेनिसमधील सांघिक स्पर्धेत जागतिक गटात भारताचा मुकाबला स्वित्झर्लंडशी होणार आहे. गुरुवारी उशिरा या स्पर्धेसाठीची ड्रॉ लंडनमध्ये काढण्यात आला. १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये हा मुकाबला होणार आहे. भारतीय संघाने गेल्याच महिन्यात टोगोचा ४-० असा दमदार पराभव करत जागतिक फेरी गाठली आहे. तर स्वित्झर्लंडचा जागतिक फेरीत पराभव झाला असला तरी भारताविरुद्ध जिंकून आगेकूच करण्याची संधी त्यांच्याकडे असणार आहे. स्पेनने त्यांना ३-१ ने हरवलं होतं. (Davis Cup Tennis)
या लढतीतील विजयी संघ पुढील वर्षी जागतिक गटाच्या पात्रता फेरीत खेळेल. तर पराभूत संघाला पुन्हा एकदा प्ले-ऑफ खेळाव्या लागतील. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान आतापर्यंत झालेल्या डेव्हिस चषक लढतीत भारताचं पारडं २-१ असं जड आहे. पण, शेवटचा सामना १९९३ मध्ये कोलकाता इथं झाला होता आणि या सामन्यात लिअँडर पेस आणि रमेश कृष्णन हे दिग्गज खेळाडू खेळले होते. या सामन्यात दोघांनी भारताला ३-२ असा विजय मिळवून दिला होता. (Davis Cup Tennis)
(हेही वाचा – Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याची सभागृहाला माहिती न देता घोषणा; विरोधकांचा तीव्र आक्षेप, सभात्याग)
त्यानंतर आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. स्वीस संघाचं नेतृत्व तीनवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा स्टॅनिस्लास वॉवरिंका करणार आहे. त्याच्याबरोबर अलेक्झांडर रिशार्ड, जरोम किम आणि मार्क आँद्रिया ह्युसनर हे खेळाडू स्वीस संघात आहेत. हे सगळे खेळाडू जागतिक क्रमवारीत ११० ते १२५ च्या दरम्यान आहेत. वॉवरिंका आता कारकीर्दीच्या उत्तरार्धात आहे आणि तो १६५ व्या क्रमांकावर आहे. (Davis Cup Tennis)
भारतीय संघाचा सर्वोत्तम खेळाडू आहे तो सुमित नागल. तो जागतिक क्रमवारीत सध्या १३२ व्या क्रमांकावर आहे. तर दुहेरीत युकी भांबरी ३९ व्या क्रमांकावर आहे. पण, या दोघांनीही शेवटचे काही डेव्हिस चषक सामने खेळले नाहीएत. तर रोहन बोपान्ना आता डेव्हिस चषकातून निवृत्त झाला आहे. सुमितने टेनिस फेडरेशनकडून एटीपी सर्किटशी मिळत्या जुळत्या मोबदल्याची मागणी केली होती. या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत करण सिंग, रामकुमार रामनाथन, शशीकुमार मुकुंद आणि श्रीराम बालाजी, रितविक चौधरी बोलिपल्ली हे टेनिसपटू भारतीय संघातून खेळले होते. तर रोहित राजपाल भारतीय संघाचे न खेळणारे कर्णधार आहेत. (Davis Cup Tennis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community