International Women’s Day : समाजासाठी काम करणे हाच माझा आनंद !; पोलीस उपायुक्त आर. रागसुधा

77
International Women’s Day : समाजासाठी काम करणे हाच माझा आनंद !; पोलीस उपायुक्त आर. रागसुधा

अनेक क्षेत्रांत असणारा महिलांचा वावर आता नवीन राहिलेला नाही. महिला म्हणून शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर अनेक आव्हाने असतात. त्यावर मात करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. प्रत्येक क्षेत्रातली आव्हाने वेगळी असतात. त्यावर मात करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही मुंबई पोलीस दलातील परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त आर रागसुधा यांच्याशी संवाद साधला. महिला म्हणून या क्षेत्रात काम करताना येणाऱ्या विविध अनुभवांविषयी आर. रागसुधा यांच्याशी सायली डिंगरे-लुकतुके यांनी मारलेल्या गप्पा… (International Women’s Day)

आर. रागसुधा या २०१५ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी परभणी येथे पोलीस अधिक्षक म्हणून काम करतांना अपहरण झालेल्या मुलांच्या संदर्भात चांगले काम केले आहे. सध्या त्या मुंबई पोलीस दलातील परिमंडळ ४ मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. (International Women’s Day)

(हेही वाचा – Dnyanjyoti Savitribai Phule Award : महिला सबलीकरण व शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी राज्यातील सहा महिलांचा सन्मान होणार)

पोलीस व्हावे, असे कधीपासून वाटू लागले? त्यासाठीची सिद्धता कशी केली?

मी मूळची तमिळनाडूची आहे. सहावीत होते, तेव्हा माझ्या शाळेत एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमुधा आल्या होत्या. तेव्हा त्यांचे बोलणे पाहून मी खूप प्रभावित झाले. तेव्हाच मी ठरवले की, मीही स्पर्धा परीक्षा देऊन अशीच लोकांची सेवा करणार. मी कृषी पदवीधर आहे. पदवी झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षांची तयारी केली. त्यासाठी दिल्लीला गेले. तिथेही अनेक आव्हाने होती. मूळची तमिळनाडूची असल्यामुळे दिल्लीत रहाताना मला मुख्य अडचण भाषेची होती. तमिळनाडूपेक्षा दिल्लीची संस्कृती वेगळी आहे. या सगळ्याशी जुळवून घेऊन २४ तास अभ्यास करत राहण्याचे आव्हान मला त्या वेळी पेलावे लागले. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात मी ती परीक्षा पास झाले. (International Women’s Day)

महिला म्हणून पोलीस दलात काम करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो ?

पोलीस दल हे समाजाशी जोडलेले आहे. त्यामुळे कधी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली, तर त्या ठिकाणी उपस्थित राहून लोकांशी बोलावे लागते. ती परिस्थिती कौशल्याने हाताळावी लागते. लोकांच्या अडचणी सोडवताना महिला म्हणून संवेदनशीलता अधिक असते. त्यामुळे महिला असल्यामुळे अडचणी अधिक संवेदनशीलतेने हाताळल्या जातात, असे मला वाटते. एखाद्या प्रकरणात एक महिला अधिकारी म्हणून बोलते, तेव्हा लोकांना विश्वास वाटतो की, महिला अधिकारी आहे, तर आपली बाजू ऐकून घेतील. तपास चांगला करतील. प्रामाणिकपणे काम करतील, असा विश्वास लोकांमध्ये दिसून येतो. ‘ही महिला आहे, तर काय काम करणार?’, या अर्थाने मला समाजातून कधीही नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत. आपले राज्य प्रगत राज्य आहे. त्यामुळे प्रशासनाकडून तर कधीच वेगळी वागणूक मिळाली नाही. समाजातूनही महिला म्हणून आदरच मिळाला. (International Women’s Day)

(हेही वाचा – Veer Savarkar यांना भारतरत्न देण्याची BJP आमदाराची मागणी)

घर आणि करिअर यांची सांगड कशी घालता ?

केवळ पोलीस दलातीलच नाही, तर कोणत्याही क्षेत्रातील महिलेला कुटुंबियांचे सहकार्य असल्याशिवाय ती करिअर करू शकत नाही. आमच्या क्षेत्रात तर कोणत्याही वेळी बाहेर निघावे लागते. कधी रात्री परत येण्यास उशीर होऊ शकतो. अशा वेळी मला कुटुंबियांचे चांगले सहकार्य लाभते. त्यामुळेच मी या क्षेत्रात काम करू शकते. सर्वच महिलांना त्यांच्या घरच्यांनी सहकार्य केले पाहिजे, असेच मला वाटते. कामाच्या वेळा कितीही वेगळ्या असल्या आणि कामाचे स्वरूप कितीही आव्हानात्मक असले, तरी हे सगळे सोडून ९ ते ५ सामान्य नोकरी करावी, असे कधीही वाटले नाही. कारण अशा प्रकारच्या प्रकरणांचा छडा लावल्यावर मला समाधान मिळते. (International Women’s Day)

अपहरण केलेल्या मुलांना सोडवले !

परभणीचे एसपी म्हणून काम करत असताना ३ मुलांचे अपहरण झाले होते. जेव्हा मी परभणीला गेले, तेव्हा या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्या वेळी त्या तीनही मुलांचे अपहरण झालेले असू शकते आणि ही एकच केस असू शकते, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो. त्यानंतर पहिले २ महिने तपास करायला आणि नंतर १० दिवस लागले. त्या मुलांना अपहरण करून तेलंगाणामध्ये त्यांना विकले होते. त्या ८ वर्षे, ९ वर्षे आणि १० वर्षांच्या मुलांना जेव्हा त्यांच्या पालकांकडे सोपवले, तेव्हा पालकांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. त्या पालकांच्या डोळ्यांतील भाव ही माझ्या पोलीस दलातील सेवेतील सर्वांत मोठी पावती होती. असे पाहिले की, चांगले वाटते आणि काम करण्याची प्रेरणा मिळते.यासोबतच अत्याचार झालेल्या महिलांना न्याय मिळवून देणारी प्रकरणे, बालकांच्या संदर्भातील प्रकरणे सोडवली की, समाधान वाटते. त्यामुळे हे क्षेत्र सोडण्याचा विचारही येत नाही. (International Women’s Day)

(हेही वाचा – Aurangzeb च्या नावे भरणाऱ्या उरसावर बंदीची मागणी)

महिलांना आवाहन !

सर्व महिला आज चांगले शिक्षण घेत आहेत. त्यांनी आर्थिकदृष्टया स्वतंत्र झाले पाहिजे. महिलांनी त्यांच्या शिक्षणाचा समाजाला लाभ होण्यासाठी प्रयत्नरत रहावे, एवढेच या निमित्ताने सांगू इच्छिते. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! (International Women’s Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.