
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या (Drain Cleaning) कामांसाठी मागवण्यात आलेल्या या निविदेमध्ये पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या कामांमध्ये कंत्राटदारांची मिलिभगत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने या सर्व कंपन्यांशी वाटाघाटी करून त्यांचे दर कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या सर्व कंत्राटदार कंपन्यांनी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा अधिक दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वाटाघाटीमध्ये सन २०२४ मध्ये असलेल्या दरामध्येच या कंपन्यांना काम करण्यास भाग पाडले आहे. त्यानुसार या कंपन्या काम करण्यास तयार झाल्याने महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांचे होणारे संभाव्य नुकसान टाळता आलेले आहे. (Drain Cleaning)
(हेही वाचा – Haryana मध्ये कोसळले लढाऊ विमान; प्रशिक्षण उड्डाण करतांना घडला अपघात)
मुंबई महापालिकेच्यावतीने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील छोट्या आणि मोठ्या नाल्यांसह मिठी नदी आणि पूर्व तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या कल्व्हर्टमधील गाळ काढण्यासाठी निविदा मागवली आहे. या निविदेमध्ये पश्चिम उपनगरातील परिमंडळ तीन, परिमंडळ चार आणि परिमंडळ सातमधील मोठ्या नाल्यांच्या कंत्राट कामांमध्ये कंत्राटदारांनी अधिक दराने कामे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. पश्चिम उपनगरातील परिमंडळ तीन करता जेआरएस इन्फ्रा ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीने अंदाजित दरापेक्षा ९.९९ टक्के अधिक दर लावला आहे. तर परिमंडळ चारमधील मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी एस. के. डेव्हलपर्स या कंपनीने अधिक ५.९९ टक्के दराने तर परिमंडळ सातमधील मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी एम. बी. ब्रदर्स या कंपनीने ३.९० टक्के अधिक दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. तर पूर्व उपनगरांतील परिमंडळ चारमध्ये त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्टर कंपनीने अंदाजित दरापेक्षा १० टक्के अधिक दर आणि परिमंडळ सहामध्ये रणुजा देव कॉर्पोरेशनने अंदाजित दरापेक्षा ६.३६ टक्के अधिक दराने बोली लावली होती. (Drain Cleaning)
(हेही वाचा – Maharashtra Budget: राज्यात दीड कोटी ग्राहक होणार वीजबील मुक्त; काय आहे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा मास्टर प्लॅन? )
यासर्व कंपन्यांशी दोन दिवसांपूर्वी वाटाघाटी करण्यात आली. महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता श्रीधर चौधरी यांनी सर्व कंत्राटदारांची बैठक बोलावून त्यांना दर कमी करण्यासंदर्भात वाटाघाटी केली. यामध्ये काही कंत्राटदार काही अंशी दर कमी करण्यास तयार होते. परंतु अतिरिक्त आयुक्तांनी ठाम भूमिका घेत मागील वर्षीप्रमाणे काम करण्यास तयार असतील तरच विचार करावा अन्यथा नव्याने निविदा मागवल्या जाव्यात अशाप्रकारच्या सूचना केल्याची माहिती मिळत आहे. त्याप्रमाणे वाटाघाटी करून त्यांना दर कमी करण्यास भाग पाडले गेले आणि त्या सर्वांना मागील वर्षी आकारण्यात आलेल्या दरामध्येच काम करण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे जे कंत्राटदार अधिक दराने कामे मिळवण्याचा प्रयत्न करत होते, ते कंत्राटदार आता मागील वर्षी आकारलेल्या दरातच काम करण्यास तयार झाल्याने महापालिकेचे होणारे संभाव्य नुकसान टाळले गेले आणि कंत्राटदारांची महापालिकेची लूट करण्याची स्वप्न उधळवून लावली आहेत. (Drain Cleaning)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community