DCM Eknath Shinde : लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन

56
DCM Eknath Shinde : लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन
DCM Eknath Shinde : लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन

लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी दिली. लाडकी बहीण योजना (Ladki Bahini Yojana) बंद करणार असे विरोधक म्हणत असले तरीही ही योजना कधीही बंद होणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडीने आयोजित केलेल्या शिवदुर्गा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकार लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार असे विचारणाऱ्यांनी निवडणुकीत ३००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण मतदारांनी त्यांना घरी बसवले, अशी टीका शिंदे यांनी विरोधकांवर केली. खुर्चीच्या मोहापायी कोणतीही तडजोड करणार नाही. लाडकी बहिण योजनेत (Ladki Bahini Yojana) जी काही वाढ करायची आहे त्याचं नियोजन आमच्या डोक्यात आहे, योग्य वेळी योग्य होईल, असे शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वस्त केले.

(हेही वाचा – महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही!; CM Devendra Fadnavis यांची ग्वाही)

अडीच वर्षापूर्वी धनुष्यबाण गहाण ठेवायचे, शिवसेना दावणीला बांधण्याचे काम केलं म्हणून उठाव केला, असे ते म्हणाले. शिवसेनेने ८० जागा लढली आणि ६० जागा जिंकल्या यावरुन खरी शिवसेना कोणाची हे निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिले. काहींना मग निवडणूक आयोगाने घोटाळा केला, इव्हीएमने घोटाळा केला अशी आवई उठवली, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला. गेल्या ५० वर्षात नागरी समस्यांची जाण असणारा कोण तर एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) असे शरद पवार (Sharad Pawar) साहेब म्हणाले आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात कोणाबद्दल काय लिहून ठेवलं हे सुद्धा माहित आहे.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्या राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांत्रीज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. ज्यांना लाडकी बहिण मानले त्या शिवदुर्गा असून त्यांना वंदन करायला आज लाडका भाऊ आला, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. ज्याच्या पाठिशी बहिणीची माया त्याचे जीवन नाही जात वाया, असे ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांचे ६० व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित महिलांनी औक्षण केले. तसेच ज्येष्ठ महिलांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांची दृष्ट काढण्यात आली.

(हेही वाचा – Madhya Pradesh मध्ये धर्मांतर करवणाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा; ‘या’ राज्याने घेतला कठोर निर्णय)

राज्यात महायुतीचे सरकार ऐतिहासिक विजय मिळवून सत्तेत आले. लोकसभेनंतर विरोधकांनी नव्या सरकारची तयारी सुरु केली होती. हॉटेल बुकिंग झाली होती, मात्र लाडक्या बहिणींनी त्यांचे बुकिंग रद्द केले, असा टोला शिंदे यांनी लगावला. महायुतीला मिळालेला विजय हा लाडक्या बहिणींचा विजय आहे, असे ते म्हणाले. राज्यात फिरत असताना मला, देवेंद्रजी आणि अजित दादांना राख्या बांधण्यासाठी लाडक्या बहिणींची गर्दी उसळायची. टेंभीनाक्याला रक्षा बंधनाला संपूर्ण हाताला राख्या बांधल्या जातात. ही आनंद दिघेंची परंपरा आहे, अशी आठवण त्यांनी यावेळी काढली. सत्ता येते जाते, पद येतील जातील पण लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद सर्व पदांपेक्षा मोठं आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून (Ladki Bahini Yojana) मिळणाऱ्या दरमहा १५०० रुपयांमधून नव्याने व्यवसाय करणाऱ्या आणि व्यवसायात विस्तार करणाऱ्या प्राजक्ता संदेश पाटील, सुजाता प्रमोद गायकवाड, पुजा प्रदीप सावंत, पुजा गणेश तारे, प्रिती प्रसाद शिंदे या कतृत्ववान महिलांचा यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते साडी चोळी आणि सन्मानचिन्ह देऊन शिवदुर्गा सन्मानाने गौरवण्यात आले. याशिवाय ऑस्ट्रेलियातील स्पर्धेत विजयी ठरलेल्या ठाणे जिल्ह्यातील राज्य सरकारी अधिकारी स्मिता संजय काजळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

रवींद्र नाट्य मंदिरमध्ये संध्याकाळी हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde), त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे (Vrushali Shinde) विशेष उपस्थित होते. त्याचबरोबर या सोहळ्याच्या आयोजक नेत्या मीनाताई कांबळी, शीतल म्हात्रे, डॉ. निलम गोऱ्हे, डॉ. मनीषा कायंदे, शायना एनसी, संध्या वढावकर, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार सदा सरवणकर यासह शेकडो महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.