-
ऋजुता लुकतुके
इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रूकने सलग दुसऱ्या हंगामात आयपीएलमधून माघार घेतली आहे. ब्रूकने आपली फ्रँचाईजी दिल्ली कॅपिटल्स आणि चाहत्यांची क्षमा मागितली आहे. ‘काही राखून न ठेवता,’ मी तुमची माफी मागतो, असं म्हणत ब्रूकने इंग्लिश संघासाठी खेळणं हीच आपली प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत इंग्लिश संघ साखळीतच गारद झाला. त्यानंतर जोस बटलरने नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे आणि बेन स्टोक्सच्या बरोबरीने सध्या हॅरी ब्रूकचीही भावी कर्णधार म्हणून चर्चा सुरू आहे. (IPL 2025)
‘यंदा आयपीएलमधून माघारीचा अत्यंत कठीण निर्णय मी घेतला आहे. त्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि चाहत्यांची मी जाहीर माफी मागतो. पण, इंग्लिश क्रिकेट संघ सध्या स्थित्यंतरातून जात आहे. आणि अशावेळी संघासाठी कायम उपलब्ध राहण्यालाच माझी प्राथमिकता असेल. मी राष्ट्रीय संघासाठी माझी असलेली कटीबद्धता सोडू शकत नाही,’ अस ब्रूकने सोशल मीडियावरील संदेशात म्हटलं आहे. ‘राष्ट्रीय संघावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मला व्यस्त कार्यक्रमातून सुटी घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे आयपीएल खेळण्याऐवजी तो वेळ मी आगामी मालिकांची तयारी करण्यासाठी वापरणार आहे. मी काय म्हणतोय, हे कदाचित सगळ्यांना समजणार नाही. पण, मला जे योग्य वाटतं, तेच मी करत आहे,’ असं पुढे ब्रूक आपल्या संदेशात म्हणतो. (IPL 2025)
(हेही वाचा – रोहित-कोहली नंतर CM Devendra Fadnavis यांच्याकडून ‘या’ खेळाडूच तोंडभरून कौतुक)
— Harry Brook (@Harry_Brook_88) March 9, 2025
जून महिन्यात इंग्लिश संघ घरच्या मैदानावर भारतीय संघाशी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमने सामने येणार आहे. जूनमध्ये नवीन कसोटी अजिंक्यपद चक्र सुरू होत आहे. आणि त्यातील ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल. तर त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात इंग्लिश संघ अशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. (IPL 2025)
याआधी २०२४ मध्ये आजी वारल्यामुळे कुटुंबाबरोबर राहण्यासाठी हॅरी ब्रूक आयपीएल खेळला नव्हता. सलग दुसऱ्या वेळी आयपीएलच्या कराराचा भंग केल्यामुळे हॅरी ब्रूकवर आयपीएल प्रशासनाकडून कारवाई होऊ शकते. दोन वर्षांसाठी आयपीएल बंदी आणण्याचा आयपीएलचा विचार आहे. येत्या २२ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स आणि बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या अठराव्या हंगामाला सुरुवात होत आहे. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community