हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जातो. श्रावण महिना व्रतवैकल्यांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. अशा श्रावण महिन्यास आता सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यातील व्रतांपैकीच सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजेच मंगळागौर. मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते.
मंगळागौरीची पूजा
सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते. त्या पूजेत मंगळागौर (म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती) मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडी ठेवतात. मंगळागौरीची षोडशोपचार पूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. या पूजाप्रसंगी शक्तीतत्वाची आराधना केली जाते. माता,विद्या, बुध्दी, धृती, शक्तीरूपात राहणा-या देवीची उपासना करतात आणि तिचे दैवी गुण स्वतःमध्ये यावेत अशी प्रार्थना केली जाते. ‘गौरी गौरी सौभाग्य दे ‘ अशी प्रार्थना करतात.सामूहिकरीत्या ही पूजा करण्यात विशेष आनंद मिळतो.
(हेही वाचा : दादर रेल्वे स्थानकाकडील हनुमान मंदिर बेकायदेशीर! रेल्वेचा ७ दिवसांचा अल्टिमेटम!)
पत्री पूजा
वेगवेगळ्या झाडांच्या पत्री (पाने) व फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत. अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती वगैरे झाडांची पाने वापरली जातात. पूजा करतांना १६ प्रकारच्या पत्री वहाव्यात असा समज आहे. पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होता. या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या विवाहितेस ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावे अशी पत्रीपूजेमागची भावना असू शकते.
मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ
वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा – इत्यादी. असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात. यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.
मंगळागौर व्रत चापल्य, चैतन्य देणारे
या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांचा व्यायाम होतो. हा खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग हाच सांगता येईल. पूर्वीच्या काळी घरातील कामे करणा-या महिलांना या खेळातून आनंद मिळे. हे खेळ खेळताना महिला जोडीने गाणीही म्हणतात. मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामुहिक जीवनाचा आनंद देणारे आहे.
Join Our WhatsApp Community